तपोवन भेटीतून मिळाली सामाजिक पत्रकारितेची नवी दिशा
आयआयएमसीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास दौरा

अमरावती /6 जानेवारी : विद्यार्थ्यांनी तपोवन महारोगी सेवा मंडळ संस्थेला अभ्यास दौर्यानिमित्त भेट देत समाजसेवेच्या एका विलक्षण पर्वाचा साक्षीदार होण्याचा अनुभव घेत सामाजिक पत्रकारितेची नवी दिशा समजून घेतली. कुष्ठ रुग्णांना औषधोपचारा सोबत मायेचा स्पर्श, मानसिक आधार आणि पुनर्वसनाच्या माध्यमातून स्वावलंबनाकडे नेणार्या तपोभूमीच्या कार्याची माहिती यावेळी विद्यार्थ्यांना मिळाली.
भारतीय जन संचार संस्थानच्या मराठी हिंदी व इंग्रजी पत्रकारिता अभ्यासक्रमच्या विद्यार्थ्यांनी शुक्रवार दि. 6 फेब्रुवारी रोजी अमरावती येथील तपोवन महारोगी सेवा मंडळ संस्थेला भेट दिली. या भेटीत विद्यार्थ्यानी प्रिंटिंग प्रेस, हस्तकला, विणकाम, सुतारकाम, सुतकताई आदी उपक्रमांची माहिती जाणून घेतली. यावेळी तपोवन संस्थेचे सचिव सहदेवराव गोळे, उपसचिव ऋषिकेश देशपांडे आणि उप अधीक्षक योगेश करडे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी उपाध्यक्ष ऋषिकेश देशपांडे यांनी तपोवन संस्थेच्या स्थापना पासूनची माहिती विद्यार्थ्यांना दिली. पद्मश्री शिवाजीराव पटवर्धन यांच्या दूरदृष्टीतून उभे राहिलेले हे कार्य आज डॉ. सुभाष गवई यांच्या नेतृत्वाखाली अधिक व्यापक स्वरूपात पुढे जात आहे. कुष्ठमुक्त झाल्यानंतरही येथील लोकांना कुटुंबीय व समाजाकडून स्वीकार मिळत नाही. अवहेलनांमुळे मानसिक खच्चीकरण झालेल्या या रुग्णांसाठी तपोवन हे केवळ आश्रयस्थान नसून नवजीवनाचा आधार असल्याचे ऋषिकेश देशपांडे यांनी सांगितले. यावेळी बोलताना क्षेत्रीय संचालक डॉ. राजेश सिंह कुशवाह म्हणाले की, कुष्ठरोगाचा वैद्यकीय उपचार सर्वत्र उपलब्ध असला, तरी उपचारानंतरचे पुनर्वसन आणि शाश्वत जीवनशैली निर्माण करण्याचे अभूतपूर्व कार्य तपोवन संस्था करीत आहे. औषधोपचाराबरोबर मानसिक आधार देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. पद्मश्री शिवाजीराव पटवर्धन यांच्या कार्याची प्रेरणादायी परंपरा पुढील पिढ्यांसाठी दीपस्तंभ ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या भेटीत विद्यार्थ्यांनी रुग्णांशी संवाद साधत त्याचे अनुभव जाणून घेत आश्रमवाशीनी तयार केलेल्या वस्तूंची खरेदी केली. हा अभ्यासदौरा केवळ शैक्षणिक उपक्रम नव्हता तर मानवी संवेदनांची जाणीव करून आणि सामाजिक बांधिलकीची दिशा दाखवणारा जीवनानुभव असल्याचे मत यावेळी विद्यार्थांनी व्यक्त केले. अभ्यास भेटीत क्षेत्रीय संचालक डॉ. राजेश सिंह कुशवाहा समवेत डॉ. विनोद निताळे, डॉ. आदित्य मिश्रा, डॉ. प्रमोद गायकवाड, जयंत सोनोने सहभागी होते.




