काकडा गावच्या विकाससाठी ग्रामस्थ एकवटले
तरुणांचा संकल्प

* शिक्षण, स्वच्छता व आरोग्यासाठी ठोस कृती आराखडा
अचलपूर /29 डिसेंबर – वैराग्यमूर्ती, थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त अचलपूर तालुक्यातील काकडा गावात एक प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. यानिमित्त गावातील सर्व तरुण एकत्र येत गाडगेबाबांच्या विचारांचा वारसा जपण्याचा आणि तो कृतीतून पुढे नेण्याचा ठाम संकल्प करण्यात आला.
गाडगेबाबांनी दिलेले शिक्षण, स्वच्छता आणि सामाजिक जागृती हे त्रिसूत्री तत्त्व केंद्रस्थानी ठेवत तरुणांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले. शिक्षणाचा मंत्र म्हणून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी लोकप्रतिनिधींच्या निधीतून एमपीएससी व यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी ऑनलाइन अद्ययावत अभ्यासिका सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
स्वच्छतेच्या मंत्राला अनुसरून संपूर्ण गाव स्वच्छ ठेवणे, नियमित स्वच्छता मोहीम राबवणे तसेच कचर्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याचा संकल्प करण्यात आला. यामुळे गाव स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी बनवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. तसेच गावातील वयस्कर व प्रौढ नागरिकांसाठी एकत्र येऊन ध्यान व प्रार्थना करता यावी, यासाठी एक भव्य व सुसज्ज सभागृह उभारण्याची संकल्पना मांडण्यात आली. हे सभागृह दुमजली असल्यास तरुणांसाठी शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी व स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीसाठी स्वतंत्र ‘जिम’ व्यवस्था उभारण्याचा मानसही व्यक्त करण्यात आला. या उपक्रमाला मूर्त रूप देण्यासाठी गावातील तरुण पुढाकार घेत असून, अक्षय नाथे, प्रणित पेटकर, अंकुश पारधी, संकेत श्रीखंडे, गजानन चतुर्भुज, सागर पांडे, रितेश आपाले, गजानन पेटकर, पंकज सहारे, राजेश ठाकरे, गोपाल बोंडे, पिंटू ठाकरे, अक्षय चिमोटे, शशिकांत पवार, अंकुश आपाले, अंकुश बोबडे, रितेश अकर्ते, दिनेश श्रीखंडे, दिनेश देशमुख, कार्तिक सावरकर, देवल श्रीखंडे, विलासराव श्रीखंडे यांच्यासह संत गाडगेबाबांच्या विचारांनी प्रेरित असलेले अनेक युवक सक्रियपणे सहभागी झाले आहेत.यावेळी सुखदेव पवार, जिल्हाध्यक्ष भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा, अमरावती ग्रामीण, यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्यासोबत छोटू सातपुते तसेच गावातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा उपक्रम केवळ पुण्यतिथीपुरता मर्यादित न राहता, गाडगेबाबांच्या विचारांप्रमाणे समाजपरिवर्तनाची चळवळ ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.




