टायरच्या स्फोटाने ट्रकची राखरांगोळी
नागपूर महामार्गावरील घटना

* चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी जीवितहानी टळली
तिवसा /11 जानेवारी : नागपूर ते अमरावती या राष्ट्रीय महामार्गावरील तिवसा येथील मृदू कोपरा परिसरात रविवारी सायंकाळी एका मालवाहू ट्रकला लागलेल्या भीषण आगीने संपूर्ण परिसर हादरवून सोडला. कलकत्ता येथून प्लास्टिकचा कच्चा माल घेऊन सुरतेच्या दिशेने जाणार्या चौदा चाकी ट्रकचा (क्रमांक एन.एल. 01 ए.डी. 2661) टायर अचानक फुटल्याने घर्षण होऊन ही आग लागली. क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केल्याने महामार्गावर आगीचे लोळ उठू लागले. सुदैवाने, आगीची चाहूल लागताच चालकाने दाखवलेली समयसूचकता आणि तिवसा नगरपंचायतच्या अग्निशमन दलाने केलेल्या वेगवान कारवाईमुळे मोठी जीवितहानी टळली आहे. मात्र, या भीषण आगीत ट्रकसह आतील लाखो रुपयांचे प्लास्टिक साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले असून वाहनाचे प्रचंड नुकसान झाले आहे. सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडलेल्या या थरारक घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे विस्कळीत झाली होती. प्लास्टिक साहित्यामुळे आगीने प्रचंड वेग घेतला होता, ज्यामुळे महामार्गावरून जाणार्या इतर वाहनधारकांमध्येही घबराट पसरली होती. घटनेची माहिती मिळताच तिवसा नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाचे जवान विजय यावले, वैभव बोकडे, अंकित माहोरे आणि राहुल आसोडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या जवानांनी आपल्या जीवाची पर्वा न करता तब्बल तीन तास पाण्याचा अखंड मारा करून आगीवर यशस्वी नियंत्रण मिळविले. महामार्ग पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली. चालकाची सतर्कता आणि अग्निशमन दलाची तत्परता यामुळे एक मोठा अनर्थ टळल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. धाडसी जवानांच्या कौशल्यामुळे टळला मोठा संहार-प्लास्टिकसारख्या अतिशय ज्वलनशील साहित्यामुळे आगीने भीषण स्वरूप धारण केले होते. अशा परिस्थितीतही तिवसा अग्निशमन दलाचे जवान विजय यावले, वैभव बोकडे, अंकित माहोरे व राहुल आसोडे यांनी जीवाची बाजी लावून केलेले कार्य अतुलनीय ठरले. ट्रक चालकाची तत्परता आणि जवानांच्या धाडसामुळेच एका मोठ्या स्फोटाचा धोका टळला असून, त्यांच्या या साहसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.




