शिक्षकांना ‘आचार्य’ म्हणण्याची परंपरा सुरू करावी
जितेंद्रनाथ महाराज यांचे आवाहन

-अमरावतीत नेत्रदीपक कार्यगौरव सोहळा
-शिव परिवाराचे भव्य आयोजन
अमरावती / 21 सप्टेंबर : अमरावती हे ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक परंपरेचे केंद्र म्हणून परिचित आहे. मराठी भाषेचा उद्गम झालेल्या या नगरीतून अनेक विचारवंत व समाजपुरुष घडले. अशा या पावन भूमीतून पुढे शिक्षकांविषयी आदर व कृतज्ञतेची परंपरा अधिक दृढ व्हावी यासाठी आजपासून पुढे समस्त शिक्षकांना ‘सर’ ऐवजी ‘आचार्य’ म्हणण्याची प्रथा सुरू व्हावी, असे भावनिक आवाहन श्री देवानाथ मठाचे मठाधीश्वर श्री श्री 1008 परमपूज्य आचार्य स्वामी जितेंद्रनाथ महाराज यांनी अमरावतीकरांना केले. शिव परिवाराच्या वतीने डॉ. पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडलेल्या कार्यगौरव सोहळ्यात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख तर विशेष अतिथी म्हणून अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे उपस्थित होते. विचारपीठावर संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते, मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावकर, संत गाडगे बाबा विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे यांच्यासह शिक्षणक्षेत्रातील व समाजातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लक्षणीय ठरली. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष गजानन पुंडकर, अॅड. भैय्यासाहेब पुसदेकर, केशवराव मेतकर, कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेघ, प्राचार्य केशवराव गावंडे, सुरेश खोटरे, प्रा. सुभाष बनसोड, श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या सचिव माधुरी चेंडके, स्व. दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा किर्ती अर्जुन, प्राचार्य डॉ. दीपक धोटे, प्रिती बंड, डॉ. श्वेता बारहाते, डॉ. स्वाती ढोरे, सिपना शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. रविंद्र कडू, विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचे सचिव युवराजसिंह चौधरी आदींची उपस्थिती ठळकपणे जाणवली.
स्वामी जितेंद्रनाथ महाराज आपल्या आशिर्वचनात म्हणाले की, शिक्षण संस्था म्हणजे फक्त इमारतींचा समूह नाही, तर त्या भविष्यातील तेजस्वी पिढी घडवणार्या कार्यशाळा आहेत. भाऊसाहेब देशमुख यांनी निर्माण केलेल्या संस्थेतून अनेक तेजस्वी व कर्तृत्ववान व्यक्ती घडल्या. आज विदर्भातील रत्नांचा गौरव होत आहे ही प्रेरणादायी बाब आहे. मराठी संस्कृतीचा आत्मा शिक्षकांमध्ये आहे. म्हणूनच ‘सर’ नव्हे तर ‘आचार्य’ हा शब्द पुन्हा रुजवला पाहिजे. शिक्षकांना त्या पवित्र नावाने संबोधणे ही खरी संस्कृतीची सेवा ठरेल.
सत्काराला उत्तर देताना कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते म्हणाले की, या सन्मानामुळे माझ्यावर अधिक चांगले कार्य करण्याचे दायित्व आहे. डॉ. अविनाश आवलगावकर यांनी सांगितले की, शिव परिवाराचा हा सत्कार मला स्फूर्तीदायक असून भविष्यात अधिक प्रेरणा देणारा आहे. तर प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे यांनी स्पष्ट केले की, भाऊसाहेबांच्या विचारांचा वारसा मला कुटुंबातून लाभला आणि आजचा गौरव त्यांच्या नावाला अर्पण आहे. खासदार अनुप धोत्रे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, शिव परिवाराने हक्काने जबाबदारी दिल्यास मी सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार असून समाजाच्या प्रगतीसाठी अशा कार्यक्रमांना नेहमीच पाठबळ राहील.
प्रास्ताविकातून हेमंत काळमेघ यांनी शिव परिवार हा फक्त संस्था नसून भाऊसाहेब देशमुखांच्या विचारांचा विस्तारित परिवार असल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मंदा नांदुरकर व प्रा. डॉ. राजेश मिरगे यांनी केले. आभार प्रदर्शन भैय्यासाहेब मेटकर यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी राजेश उमाळे व संच यांनी भाऊसाहेबांचे गौरवगीत सादर केले, तर शेवटी तेजस कडू व संच यांनी ‘गोपाला गोपाला’ हे गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
या भव्य कार्यगौरव सोहळ्याला संपूर्ण विदर्भातील शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर, प्राध्यापक, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रत्येक टप्प्यातून अमरावतीकरांनी एक आगळावेगळा आणि प्रेरणादायी सोहळा अनुभवला.
-मान्यवरांचा सत्कार
या नेत्रदीपक सोहळ्यात विदर्भातील कर्तृत्ववान रत्न म्हणून संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते, मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावकर व संत गाडगे बाबा विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे यांचा सपत्नीक शाल, श्रीफळ, मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन शिव परिवाराच्या वतीने गौरव करण्यात आला. यावेळी गौरवमूर्तींच्या कार्यावर विशेष माहितीपट दाखवण्यात आला. तुतारी, पारंपरिक लेझीम व आदिवासी नृत्याच्या तालावर पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. या वातावरणाने संपूर्ण सभागृहात उत्साहाची लहर निर्माण झाली.




