मृतकांच्या समर्थकांचा शहरात हैदोष

अनेक ठिकाणी दगडफेक, दुचाकी-चारचाकी वाहनांची तोडफोड

* 15-20 तरुणांची तलवारी घेऊन दहशत, – पोलिसांसमोर मोठे आव्हान

अमरावती/19 डिसेंबर – स्थानिक मन्या उर्फ मंथन रवींद्र पाळनकर याच्या हत्येनंतर अमरावती शहरात रात्री 9 ते 9.30 च्या दरम्यान भीषण दहशताचे वातावरण पसरले. शहराच्या विविध भागांत 15-20 तरुणांच्या टोळक्यांनी हातात दंडुके, तलवारी घेऊन दहशत पसरवित केडिया नगर, स्वस्तिक रोड, हरी गंगा ऑईल मिल परिसर, फरशी स्टाप, नवाथे, गोपाल नगर, शंकर नगर आणि बचत मॉल परिसर या भागात टोळ्यांनी रस्त्यावर दगडफेक करून गोंधळ घातल्याची घटना घडली, गोंधळ मोठ्या प्रमाणात असल्याने आमदार रवी राणा यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती राजापेठ पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, या टोळ्यांचा रौद्र वावर आणि त्यांचा संघटित दहशतकारी अंदाज पाहता पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. अमरावती पोलिसांनी नागरिकांना शांती राखण्याचे आवाहन केले असून, टोळ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. शहरातील सुरक्षा वाढवण्यासाठी अतिरिक्त पोलीस पथके तैनात करण्यात आली आहेत. स्थानिकांनी सांगितले की, हातात दंडुके, तलवारी, चाकू आणि दगड घेऊन आलेल्या या टोळ्यांनी नागरिकांना घाबरवले. जे लोक दुर्भाग्याने त्यांच्या मार्गात आले, त्यांना मारहाण केली गेली. काही दुचाकी आणि चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली, तर काही ठिकाणी काचे फोडल्या गेल्या. नागरिकांमध्ये भीती पसरली, रस्त्यावर एकही सुरक्षित वाटा उरला नव्हता. घटना पाहून काही लोकांनी पोलीस स्टेशनकडे धाव घेतली.
सूत्रांच्या माहितीप्रमाणे, या टोळ्यात अल्पवयीन तरुणांचा मोठा सहभाग होता. हे तरुण समाजाच्या नियमांना नाकारून हिंसाचार करण्यास तयार असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पोलीसांसमोर मोठा आव्हान उभा राहिला आहे – तरुण टोळ्यांवर नियंत्रण ठेवणे आणि शहरातील शांती पुन्हा प्रस्थापित करणे.
विशेष पथकांनी शहरातील विविध भागांमध्ये गस्त घालून टोळ्यांचा मागोवा सुरू केला आहे. पोलिसांनी नागरिकांना संयम ठेवण्याचे आवाहन केले असून, ज्या भागात हिंसाचार झाला, तेथे सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. स्थानिकांनी सांगितले की, रात्रीच्या अंधारात टोळ्यांनी केलेल्या हिंसाचारामुळे शहरातील वातावरण तणावपूर्ण झाले आहे. वाहनांची तोडफोड, मारहाण आणि रस्त्यावरील दहशत यामुळे नागरिकांची रोजची सुरक्षितता धोक्यात आली आहे. अनेक नागरिक घरी बसून बाहेर पडण्याचे टाळत आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button