‘युती’चा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्याचे अधिकार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले संकेत

* शक्य आहे, तिथे युती करण्यास प्राधान्य
* शिक्षक मतदार संघासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघावर चर्चा
* विभागीय पदाधिकार्यांच्या बैठकीला मान्यवरांची उपस्थिती
अमरावती / 13 ऑक्टोंबर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी युती करण्यासंदर्भात स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार पक्षाकडे आहेत, पण ज्या ठिकाणी शक्य आहे, तिथे युती केली पाहिजे, असे निर्देश दिले गेले आहेत. तसेच, एखाद्या ठिकाणी युती झाली नाही तरी मित्र पक्षांवर टीका करू नये, असा सल्ला देण्यात आला आहे. महायुतीतून निवडणुकीत चांगले यश तीनही पक्षांना मिळेल, असा विश्वास पक्षाला आहे. स्वबळावर निवडणूक लढवण्याची कार्यकर्त्यांची इच्छा नेहमीच असते, पण स्थानिक परिस्थितीचा विचार करून निर्णय घेणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी शक्य आहे, तिथे मित्र पक्षांसोबत युती करून निवडणूक लढविली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज अमरावतीत पश्चिम विदर्भ स्थानिक स्वराज्य संस्था आणि शिक्षक मतदारसंघ निवडणूक पूर्वतयारी पदाधिकारी बैठकीचे आयोजन करण्यात आले, यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी संपूर्ण राज्यात विभागनिहाय बैठकांचे नियोजन केले आहे. महापालिका, जिल्हा परिषदा, नगर पालिका आणि नगर पंचायत यांच्या निवडणुकांनिमित्त आढावा घेण्यासाठी या बैठकांचे आयोजन केले जात आहे. यापूर्वी मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र अशा चार विभागांचा आढावा घेतला गेला आहे. आज अमरावती आणि नागपूर विभागाचा आढावा घेण्यात आला, तर पुढील आठवड्यात मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, कार्यकर्त्यांची मानसिकता आणि तयारी चांगली आहे आणि निवडणुकीसाठी पक्षाची यंत्रणा सज्ज आहे. कार्यकर्त्यांना दिशानिर्देश देऊन या निवडणुका जिंकण्यासाठी वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र प्रियांक खरगे यांनी मुख्य सचिवांना पत्र पाठवून सार्वजनिक उद्याने आणि धार्मिक संस्थांशी संबंधित ठिकाणी संघाच्या कार्यक्रमावर बंदी घालावी, अशी मागणी केली होती. यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, प्रियांक खरगे हे प्रसिद्धीसाठी अशा गोष्टी करतात आणि त्यांना काहीच स्टँडिंग नाही. ते वडिलांच्या भरवशावर राजकारण करतात. अनेक वेळा संघावर बंदी घालण्याचा प्रयत्न झाला, पण बंदी घालता आलेली नाही. ज्या इंदिरा गांधींनी संघावर बंदी घातली, त्यांना सत्तेहून पायउतार व्हावे लागले.




