स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव
दिलीपबाबू इंगोले यांचे प्रतिपादन

अमरावती/15 जानेवारी : लहान वयात विद्यार्थ्यांच्या आंतरिक सुप्त गुणांना वाव देण्यासाठी स्नेहसंमेलन हे एक व्यासपीठ असून त्यामाध्यमातून विद्यार्थ्यांची प्रतिभा पुढे येत असते. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव सर्वप्रथम शालेय स्नेहसंमेलनातूनच मिळत असतो असे प्रतिपादन श्रीराम मंदिर ट्रस्ट,कुंड सर्जापूर चे अध्यक्ष तथा श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीपबाबू इंगोले यांनी केले.
येथून जवळच असलेल्या कुंड सर्जापूर येथील चंद्रभानजी विद्यालयाचे दोन दिवसीय स्नेहसंमेलन नुकतेच पार पडले. त्यात उद्घाटकीय कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीराम मंदिर ट्रस्टचे सदस्य प्राचार्य गजाननराव इंगोले होते. यावेळी ट्रस्टचे सदस्य रमेशपंत बहाळे, वसंतराव मानकर, सुधिरराव कुकडे, संजयराव मानकर, चंद्रशेखरराव मानकर, अशोकराव मानकर, सत्कारमुर्ती व डॉ. पंजाबराव देशमुख अर्बन को-ऑप बँकेचे संचालक अक्षय इंगोले, माजी मुख्याध्यापक आर.एस.गावंडे, रमेशपंत किटूकले व स्वागताध्यक्ष तथा चंद्रभानजी विद्यालयाचे मुख्याध्यापक एन.टी.चव्हाण आदी उपस्थित होते.सर्वप्रथम दिपप्रज्वलन करून तसेच प्रभू श्री राम, शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख, दानदाते स्व.चंद्रभानजी मानकर व विद्यालयाचे संस्थापक स्व.रावसाहेब इंगोले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून तथा दिप प्रज्वलन करून या स्नेहसंमेनाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात डॉ. पंजाबराव देशमुख बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल अक्षय दिलीप इंगोले तसेच महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेले शाळेचे क्रीडा शिक्षक शरद वसंतराव गढीकर यांचा सर्व मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.




