‘शकुंतला’चे पुनरागमन : इतिहास जपत ब्रॉडगेजच्या दिशेने वाटचाल
सात दशकांची परंपरा आणि सात वर्षांचा संघर्ष

-आंदोलनातून डीपीआर मंजुरीचे यश
अमरावती / 14 सप्टेंबर : वर्हाडातील ग्रामीण भागाचा प्रामुख्याने अचलपूर, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, आकोट, मुर्तिजापूर या अमरावती आणि अकोला जिल्ह्यातील तालुक्यांचा श्वास ठरलेली व ब्रिटिश काळापासून अविरत धावणारी शकुंतला रेल्वे आता इतिहासातून पुढे सरकत नवे रूप धारण करण्याच्या मार्गावर आली आहे. सात दशकांची प्रवास परंपरा लाभलेल्या या रेल्वेचा अनेक खाचखळग्यांतून प्रवास झाला. आता असंख्य सजग नागरिकांच्या सात वर्षांच्या संघर्षातून शकुंतला रेल्वेची आधुनिकतेकडे वाटचाल सुरु होण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. भारतीय मध्य रेल्वेच्या डीपीआर मंजूरीमुळे अचलपूर-मुर्तिजापूर रेल्वे मार्गाची ब्रॉडगेजकडे वाटचाल होणार आहे.
कापसाच्या गाठी वाहून नेण्यासाठी 1910 च्या दशकात ब्रिटिश कंपनी किलिक-निक्सनच्या पुढाकारातून सुरू झालेला हा मार्ग आजही लोकजीवनाशी जोडलेला आहे. त्या काळी स्थापन झालेल्या ‘सेंट्रल प्रोव्हिन्स रेल्वे कंपनी’ च्या अखत्यारीत हा नॅरोगेज मार्ग मुर्तिजापूर ते अचलपूर असा धावू लागला. वसाहती राजवटीच्या नफेखोर उद्देशातून सुरू झालेल्या या रेल्वेने मात्र नंतर सामान्य जनतेच्या प्रवासाची जीवनरेषा बनत वर्हाडाच्या ग्रामीण भागाला आधार दिला.
शकुंतला रेल्वेचा मार्ग यवतमाळ, अमरावती जिल्ह्यातील अनेक गावांना मुख्य रेल्वे लाईनशी जोडत होता. अचलपूर ते मुर्तिजापूर या 76 किमी अंतरावरून रोज कापसाच्या गाठी मुख्य मार्गावर पोहोचवल्या जात. स्वातंत्र्यानंतरही हा मार्ग बराच काळ सीपीआरसीच्या अखत्यारीत राहिला. भारतीय रेल्वेच्या ताब्यात गेल्यावरही नॅरोगेजच्या मर्यादा कायम राहिल्या. प्रवासाचा वेग कमी, डब्यांची क्षमता मर्यादित आणि देखभालीचा खर्च अधिक असल्याने ब्रॉडगेज रूपांतरणाची गरज अधोरेखित होत राहिली.
गेल्या काही वर्षांत सेवेत अडथळे आले, कोविड काळात गाड्या थांबल्या आणि प्रवाशांना प्रवासाचा स्वस्त पर्यायही बंद झाला. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली. शकुंतला रेल्वे बचाव समितीच्या माध्यमातून गेल्या सात वर्षांपासून स्थानिक नागरिकांनी अखंड, अहिंसक सत्याग्रह उभारला. वारंवार धरणे, आंदोलने, निवेदने, पदयात्रा अशा लोकशाही मार्गाने आंदोलनकर्त्यांनी शासनाचे लक्ष वेधले. अचलपूर-मुरतिजापूर मार्गाच्या ब्रॉडगेज रूपांतरणाची मागणी त्यांनी ठामपणे मांडली.
-यशाची दिशा
या सातत्यपूर्ण संघर्षाचे फलित अखेर मिळाले असून अचलपूर-मुर्तिजापूर ब्रॉडगेज रूपांतरणासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) मंजूर झाला आहे. या निर्णयामुळे शकुंतला रेल्वेचे भविष्य उज्ज्वल होणार असून या मार्गाला नवे आयाम प्राप्त होतील. ब्रॉडगेजमुळे गती, क्षमता आणि प्रवाशांची सुविधा वाढणार आहे. ग्रामीण भागातील आर्थिक व्यवहार, व्यापारी संपर्क, शालेय व आरोग्यसेवा यासाठी प्रवासाचा सहज, स्वस्त व जलद पर्याय पुन्हा उपलब्ध होणार आहे.
-वारसा आणि आधुनिकता
शकुंतला रेल्वे हा फक्त एक प्रवासमार्ग नाही, तर वर्हाडाच्या इतिहासाशी, ग्रामीण जीवनाशी आणि भावनांशी जोडलेला वारसा आहे. एका बाजूला ब्रॉडगेज रूपांतरणामुळे आधुनिकतेची दिशा मिळणार असली तरी लोकांची अपेक्षा आहे की, या रेल्वेचा वारसा जपला जावा आणि शकुंतलेची ऐतिहासिक ओळख जिवंत ठेवली जावी.




