नगरसेवकांचे निकाल प्रथम, नगराध्यक्षांचा निकाल अखेरीस
21 डिसेंबरच्या मतमोजणीसाठी प्रशासनाचा स्पष्ट क्रम

अमरावती /10 डिसेंबर : जिल्ह्यातील 10 नगरपालिका आणि दोन नगरपंचायतींच्या 21 डिसेंबर रोजी होणार्या मतमोजणीसाठी प्रशासनाने स्पष्ट आणि सोपा क्रम जाहीर केला आहे. यानुसार सर्वप्रथम नगरसेवकपदाची मतमोजणी होईल आणि त्या सर्व जागांचे निकाल लागल्यानंतरच नगराध्यक्षपदासाठीची मतमोजणी सुरू केली जाईल. त्यामुळे नगराध्यक्षांचा अंतिम निकाल सर्वात शेवटी जाहीर होणार आहे.
नगरसेवकांच्या तुलनेत नगराध्यक्षांचा मतदारसंघ मोठा असल्याने त्यांच्या मतांची एकत्रित बेरीज करण्यास अधिक वेळ लागणार आहे. प्रत्येक प्रभागातील मतदान वेगाने मोजता यावे म्हणून नगरसेवकांच्या मतमोजणीला प्राधान्य देण्यात आले आहे. 2 डिसेंबर रोजी झालेल्या मतदानात जिल्ह्यात दर्यापूर, अचलपूर, चिखलदरा, चांदूर बाजार, मोर्शी, वरुड, शेंदुरजना घाट, चांदूर रेल्वे आणि धामणगाव रेल्वे या नऊ नगरपालिकांसह धारणी आणि नांदगाव खंडेश्वर या नगरपंचायतींचा समावेश होता. अंजनगाव सुर्जी नगरपालिका या प्रक्रियेपासून बाहेर होती. संपूर्ण जिल्ह्यात सरासरी 68.38 टक्के मतदान नोंदले गेले. प्रशासनाने मतमोजणी साठी प्रत्येक शहराचे मुख्यालय निश्चित केले आहे. काही ठिकाणी तहसील कार्यालयात, तर काही ठिकाणी नगरपालिका सभागृहात मतमोजणी केली जाणार आहे. नांदगाव खंडेश्वर येथील मतमोजणी शासकीय आयटीआयमध्ये तर अचलपूर शहरातील मतमोजणी कल्याण मंडपम या खासगी स्थळावर होईल. सर्व केंद्रांवर मतमोजणी सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे. दोन टप्प्यांत मतदान झालेल्या शहरांतील काही मतदारांना पुन्हा एकदा मतदान करावे लागणार आहे. शाई कोणत्या बोटावर लावायची याबाबत निर्माण झालेल्या गोंधळानंतर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले आहे. अशा मतदारांच्या डाव्या हाताच्या मधल्या बोटावर 20 डिसेंबर रोजी मतदानाची नोंद केली जाणार आहे. या सर्व तयारीमुळे 21 डिसेंबर रोजी मतमोजणी सुयोग्य आणि नियोजनबद्ध रीतीने पार पडण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




