नगराध्यक्ष, नगरसेवक होण्याची लगबग सुरू!

अचलपुरात 7, चिखलदर्‍यात 1 उमेदवारांनी दाखल केले ऑनलाइन नामांकन

अमरावती /10 नोव्हेंबर – अमरावती जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकींची अधिसूचना जाहीर होताच राजकीय वातावरणात चैतन्य निर्माण झाले आहे. आजपासून नामांकन प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाल्यानंतर जिल्हाभरात उमेदवारांच्या हालचालींना वेग आला आहे. पहिल्याच दिवशी दुपारपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील दहा नगर परिषद आणि दोन नगर पंचायत – धारणी आणि नांदगाव खंडेश्वर – येथे मिळून एकूण आठ उमेदवारांनी ऑनलाइन नामांकन दाखल केले आहे. यामध्ये अचलपुर नगर परिषदेतून 7 आणि चिखलदरा नगर परिषदेतून 1 उमेदवाराचा अर्ज दाखल झाला आहे. दरम्यान, इतर कोणत्याही नगर परिषद किंवा पंचायत क्षेत्रातून सोमवारी दुपारी
चारपर्यंत कोणतेही नामांकन दाखल झाले नसल्याची माहिती अधिकृत प्रशासनिक सूत्रांनी दिली आहे. निवडणुकीसाठी ऑनलाईन नामांकन भरण्याची अनिवार्यता असल्याने अनेक उमेदवार आज दिवसभर संबंधित दस्तऐवज व माहिती गोळा करण्यात गुंतले होते.अचलपुरात उमेदवारांची जोरदार तयारी अचलपुर ही जिल्ह्यातील एकमेव ‘अ’ श्रेणीची नगर परिषद असल्याने येथे राजकीय चुरस अपेक्षित आहे. अचलपुरचे प्रतिनिधी संजय अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या दिवशी कोणताही उमेदवार प्रत्यक्ष नामांकन घेऊन मुख्याधिकारी तथा निवडणूक अधिकारी वाहुरवाघ यांच्या कार्यालयात पोहोचला नव्हता. तरीही, ऑनलाइन माध्यमातून सात उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. नगर परिषद प्रशासनाने उमेदवारांसाठी सर्व तयारी पूर्ण ठेवली होती. मात्र प्रत्यक्ष अर्ज दाखल करण्याची गडबड अद्याप सुरू झाली नाही.
दर्यापुर, अंजनगाव सुर्जीमध्ये शून्य नामांकन-दर्यापुरचे प्रतिनिधी विलास महाजन यांनी कळविले की, दर्यापुर नगर परिषदेत पहिल्या दिवशी नगराध्यक्ष किंवा नगरसेवक पदासाठी एकही नामांकन दाखल झाले नाही. अंजनगाव सुर्जी नगर परिषदेचीही अशीच स्थिती राहिली. या दोन्ही ठिकाणी अद्याप राजकीय समीकरणं स्पष्ट होत नसल्याने इच्छुक उमेदवार कागदपत्रांची तयारी आणि पक्षांतर्गत चर्चांमध्ये गुंतलेले असल्याचे समजते. दर्यापुरात 25 तर अंजनगाव सुर्जीमध्ये 28 नगरसेवक निवडले जाणार असून दोन्ही ठिकाणी नगराध्यक्षपदाची निवड थेट जनतेतून होणार आहे.
वरूड, चांदूर बाजार, धामणगावमध्ये संभ्रमाचे वातावरण-वरूड, चांदूर बाजार आणि धामणगाव रेल्वे या तीन नगर परिषद क्षेत्रांमध्ये आज पहिल्या दिवशी उत्साहापेक्षा संभ्रम अधिक जाणवला. या तिन्ही ठिकाणांहून प्राप्त माहितीनुसार, अनेक इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांबाबत निवडणूक अधिकार्‍यांकडून वकिलांकडून माहिती घेतली. त्यामुळे नामांकन दाखल करण्याचा वेग दुसर्‍या दिवसापासून वाढेल, असा अंदाज स्थानिक प्रतिनिधींनी व्यक्त केला आहे. चांदूर रेल्वे येथे तहसीलदार पूजा माटोडे या निवडणूक अधिकारी आहेत, तर वरूडमध्ये शिवदास मुसले यांनी निवडणुकीची जबाबदारी स्वीकारली आहे. धामणगाव रेल्वे येथे पवन शर्मा यांच्या माहितीनुसार, उमेदवारांनी अर्ज डाउनलोड करून प्राथमिक तपासणी केली असून मंगळवारपासून नामांकन प्रक्रिया गती घेईल.
सायबर कॅफे, झेरॉक्स दुकानांत उमेदवारांची गर्दी-संपूर्ण जिल्हाभरात निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होताच सायबर कॅफे आणि झेरॉक्स दुकानांमध्ये उमेदवारांची मोठी गर्दी दिसून आली. ऑनलाइन नामांकन डाउनलोड करून अर्ज सादर करण्यासाठी आवश्यक तांत्रिक मदत मिळविण्यासाठी उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते दिवसभर रांगा लावताना दिसले. ग्रामीण भागातील अनेक उमेदवारांनी संगणक ज्ञान नसल्याने संबंधित केंद्रांवर मदत घेण्याचा पर्याय निवडला आहे.
2 डिसेंबरला मतदान-अमरावती जिल्ह्यातील एकूण 12 नगर परिषद आणि पंचायतांमध्ये मिळून 278 नगरसेवक आणि 12 नगराध्यक्ष निवडले जाणार आहेत. यासाठी 2 डिसेंबरला मतदान होणार असून, राजकीय पक्षांनी संभाव्य उमेदवारांची निवड अंतिम टप्प्यात आणली आहे. नामांकन प्रक्रिया सुरू झाल्याने आता पक्षनिहाय उमेदवारी घोषणांच्या प्रतीक्षेत कार्यकर्ते आणि मतदारवर्ग आहे. आगामी काही दिवसांत राजकीय समीकरणांना वेग येणार असून, अचलपुर, दर्यापुर आणि चांदूर बाजार येथे चुरस अपेक्षित असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

* कागदपत्रांसाठी उमेदवारांची धावपळ

नगराध्यक्ष असो वा नगरसेवक, सर्व इच्छुक उमेदवारांना नामांकन सादर करताना विविध कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे. त्यामुळे सकाळपासूनच शहरातील सायबर कॅफे, झेरॉक्स केंद्रे, वकिलांची कार्यालये आणि करसल्लागारांचे कार्यालये याठिकाणी मोठी गर्दी दिसून आली. निवासी दाखला, मतदार यादीतील क्रमांक, घरकराची पावती, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, तसेच मालमत्तेचा तपशील यासारखी कागदपत्रे उमेदवारांना सादर करावी लागणार आहेत. त्यासोबतच वर्गनिहाय ठेव रकमांची तरतूद आणि मालमत्तेचा खुलासा अनिवार्य असल्याने वकिल आणि चार्टर्ड अकाउंटंट यांच्याकडे सल्ला घेण्यासाठी उमेदवारांची वर्दळ होती. विशेषतः उत्पन्न दाखल्यासाठी महसूल कार्यालयात सर्वाधिक गर्दी झाल्याचे स्थानिक प्रतिनिधींचे निरीक्षण आहे.

संबंधित बातम्या

Back to top button