तालुक्यात जन तक्रार निवारण दिन संपन्न

गटविकास अधिकार्‍यांना अहवाल पाठविण्याचे निर्देश

अमरावती /5 फेब्रुवारी : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेनुसार तालुका स्तरावर जनता दरबार आयोजित करून नागरिकांच्या तक्रारींचे प्रभावी निवारण करण्यासाठी पंचायत समिती धामणगांव रेल्वे येथे नुकतेच जन तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र उपस्थित होत्या.
जिल्हा नियोजन समितीच्या सभेत तालुका स्तरावर तक्रार निवारण बैठक आयोजित करून नागरिकांच्या तक्रारी, विकास कामांची सद्यस्थिती, प्रलंबित प्रस्ताव तसेच स्थानिक पातळीवरील समस्यांचा आढावा घेण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले होते. त्या अनुषंगाने धामणगांव रेल्वे पंचायत समितीच्या सभागृहात पहिली जन तक्रार निवारण समिती सभा पार पडली. या बैठकीदरम्यान कामनापूर घुसळी, बोरगांव धांदे, देवगाव आदी गावांतील नागरिकांकडून विविध तक्रारी प्राप्त झाल्या. प्राप्त तक्रारींवर 20 फेब्रुवारी पर्यंत अंतिम कार्यवाही करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गटविकास अधिकारी यांना दिले. पुढील आठवड्यात मोर्शी, धारणी, चिखलदरा तसेच अमरावती पंचायत समिती स्तरावर जन तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.दरम्यान, दौर्‍याच्या अनुषंगाने संजीता महापात्र यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत कावली व ढाकुळगांव या गावांना भेट देऊन राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत गटविकास अधिकारी प्रफुल्ल भोरखडे तसेच पंचायत समिती स्तरावरील अधिकारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button