अंजनगाव सुर्जीतील विवेक काकड यास पोलिसांनी ठोकल्या बेड्या
साडेचार कोटींचा कर बुडविल्याचा आरोप

* अडीच वर्षांपासून आरोपी होता फरार
* आर्थिक गुन्हे शाखेची नागपुरात धडक कारवाई
अमरावती /12 जानेवारी : राज्य शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवून गेल्या अडीच वर्षांपासून पोलिसांना हुलकावणी देणार्या अंजनगाव सुर्जी येथील एका बड्या व्यापार्याला अखेर नागपुरातून अटक करण्यात आली आहे. साडेचार कोटी रुपयांचा विक्री कर थकवून सरकारची फसवणूक करणार्या या व्यापार्याचे नाव विवेक सुधाकर काकड असून, अमरावती ग्रामीण पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही धाडसी कारवाई केली आहे.
आरोपीने स्वतःची ओळख लपवून पोलिसांची दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला, मात्र अत्यंत अभ्यासू आणि नियोजनबद्ध पद्धतीने सापळा रचून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. अंजनगाव सुर्जी येथील ‘साईबाबा कॉर्पोरेशन’ या पेढीच्या माध्यमातून कापूस आणि रुईचा मोठा व्यवसाय करणार्या विवेक काकड याने 2011 ते 2015 या आर्थिक वर्षांच्या कर निर्धारण काळात शासनाकडे अधिकृत विक्री कर जमा केला नाही. वारंवार सूचना आणि नोटिसा देऊनही त्याने 4 कोटी 48 लाख 16 हजार 507 रुपयांचा कर भरण्याऐवजी त्या रकमेचा स्वतःच्या वैयक्तिक कामांसाठी वापर केला. राज्य कर निरीक्षक चेतन प्रकाश सोनारे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर, 4 ऑगस्ट 2023 रोजी याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असलेला हा आरोपी नागपूरच्या अशोक नगर भागात लपून बसल्याची माहिती मिळताच पोलिसांनी मुसक्या आवळल्या. तपासादरम्यान पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्रही सादर केले होते. सध्या आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून, त्याने पुन्हा पलायन करू नये म्हणून त्याला न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी तपास अधिकारी विनोद धाडसे यांनी केली आहे.




