तडीपार गुंडाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
धारदार शस्त्रासह आरोपी अटकेत

* बडनेरा परिसरात पोलिसांची मोठी कारवाई
अमरावती / 8 जानेवारी : शहरातून हद्दपार करण्यात आलेला एक कुख्यात गुंड पुन्हा शहरात शिरकाव करून सार्वजनिक ठिकाणी हातात धारदार शस्त्र घेऊन दहशत माजवत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुन्हे शाखा अमरावती शहरच्या पथकाने अत्यंत सतर्कता दाखवत या तडीपार गुंडाला शस्त्रासह अटक केली आहे. उमेश महादेवराव मेश्राम असे या 50 वर्षीय आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून एक लोखंडी चाकू जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे बडनेरा परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला असून पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. 8 जानेवारी रोजी गुन्हे शाखेला खात्रीशीर बातमी मिळाली की, मिलचाळ नवी वस्तीकडे जाणार्या रस्त्यावर एक इसम हातामध्ये चाकू घेऊन लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार तो इसम तडीपार असूनही बेकायदेशीरपणे शहरात वावरत होता. पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि सापळा रचून उमेश मेश्रामला शस्त्रासह ताब्यात घेतले. तपासणी दरम्यान त्याच्याकडून 1 हजार रुपये किमतीचा लोखंडी चाकू जप्त करण्यात आला. याप्रकरणी बडनेरा पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 सह महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम 142 व 135 अन्वये गुन्हा नोंदवून पुढील कायदेशीर प्रक्रिया करण्यात आली आहे.पोलीस आयुक्त राकेश ओला, उपायुक्त गणेश शिंदे, श्याम घुगे आणि रमेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. यात सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी बचाटे यांच्यासह संदीप चव्हाण, महेश इंगोले, गजानन ढेवले, मनोज ठोसर, मंगेश परीमल, विकास गुडधे, नईम बेग, योगेश पवार आणि सागर ठाकरे या अनुभवी पोलीस कर्मचार्यांचा सहभाग होता.




