स्वामी विवेकांनद यांच्या तत्त्वज्ञानातच भारताच्या सर्वांगीण पुनरुत्थानाचा मार्ग
माधव पांडे यांचे प्रतिपादन

अमरावती /14 जानेवारी – स्वामी विवेकानंदांचे विचार आणि भारताचे ’विश्वगुरू’ होण्याचे स्वप्न यांचा अत्यंत घनिष्ठ संबंध आहे. स्वामीजींनी केवळ अध्यात्माचा प्रसार केला नाही, तर भारताच्या सर्वांगीण पुनरुत्थानाचा मार्ग जगाला दाखवून दिला, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध वक्ते व लेखक श्री. माधव पांडे यांनी येथे केले. श्री रामकृष्ण विवेकानंद समिती अंतर्गत विवेकानंद ग्रंथालयाद्वारे ’राष्ट्रीय युवा दिनानिमित्त’ आयोजित व्याख्यानमालेत ते ‘भारताचे विश्वगुरू स्वप्न आणि स्वामी विवेकानंद’या विषयावर बोलत होते. या व्याख्यानमालेचे द्वितीय पुष्प गुंफताना श्री. पांडे यांनी स्वामीजींच्या विचारांची प्रासंगिकता अधोरेखित केली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रा. रवींद्र कडू यांनी माधव पांडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. जगाचे कल्याण हाच विश्वगुरूचा मूळ अर्थआपल्या अभ्यासपूर्ण मांडणीत श्री. माधव पांडे म्हणाले की, स्वामी विवेकानंदांनी सांगितलेले ’योग’ आणि ’वेदान्त’ हे विचार जगाला मार्गदर्शन करण्यासाठी सक्षम आहेत आणि हीच भारताच्या विश्वगुरू होण्याच्या प्रवासातील पहिली पायरी आहे. स्वामीजींच्या मते, विश्वगुरू होणे म्हणजे केवळ राजकीय सत्ता गाजवणे नव्हे, तर जगाचे कल्याण करणे होय. त्यांनी पुढे नमूद केले की, स्वामीजींनी दिलेला ’दरिद्री नारायणाची सेवा’ हा मंत्र भारतासाठी आजही दिशादर्शक आहे. जेव्हा भारत आपल्या अंतर्गत सामाजिक समस्या यशस्वीपणे सोडवून जगाला मदतीचा हात देईल, तेव्हाच आपण खर्या अर्थाने विश्वगुरू ठरू. स्वामीजींच्या युवकांवरील विश्वासाचा संदर्भ देताना श्री. माधव पांडे म्हणाले, स्वामीजींना अपेक्षित असलेले सुदृढ आणि चारित्र्यवान युवक आजच्या काळाची गरज आहेत. भारताकडे आज जगातील सर्वाधिक तरुण लोकसंख्या आहे. या युवाशक्तीने जर स्वामीजींचे विचार आत्मसात केले, तर भारताला विश्वगुरू होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. मान्यवरांची उपस्थिती या व्याख्यानमालेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अमरसिंह राठोड होते. व्यासपीठावर ग्रंथालयाचे सचिव डॉ. मंगेश निर्मळ, उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. रमेश बिजवे, तसेच श्री रामकृष्ण विवेकानंद समितीचे अध्यक्ष श्री. हरिहर जिराफे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाला समितीचे पदाधिकारी श्री. दत्तात्रय अबाळे, प्रा. शरद बंड, श्री. प्रमोद देशमुख,ग्रंथपाल श्री.महेश देशपांडे यांच्यासह समितीचे अन्य सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




