मनपा निवडणुकीत नववर्षाच्या जल्लोषासह मकरसंक्रांतीची गोडी
जुन्या वर्षात उमेदवारी अर्ज, नव्या वर्षात नगरसेवक

माजी नगरसेवकांसह इच्छुक उमेदवारांचा जनसंपर्क वाढविण्यावर भर
अमरावती /16 डिसेंबर : मनपा निवडणुकांची अखेर घोषणा झाल्याने शहराच्या राजकारणात नव्या उत्साहाची लाट उसळली आहे. सन 2017 नंतर तब्बल अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर निवडणूक आयोगाने महापालिका निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून, शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ज्या क्षणाची वाट पाहत सर्व राजकीय पक्ष, इच्छुक उमेदवार आणि माजी नगरसेवक होते, तो क्षण अखेर आला आहे.
घोषित कार्यक्रमानुसार 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारीला मतमोजणी केली जाणार आहे. त्यामुळे जुन्या वर्षात उमेदवारी अर्ज भरले जाणार असून, नव्या वर्षात शहराला नवे नगरसेवक मिळणार आहेत. निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रत्येक प्रभागात हालचालींना वेग आला आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. 30 डिसेंबर ही अर्ज भरण्याची अंतिम मुदत असेल. 31 डिसेंबर रोजी अर्जांची छाननी केली जाणार असून 2 जानेवारी रोजी अर्ज मागे घेण्याची संधी देण्यात येणार आहे. 3 जानेवारीला उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष प्रचाराचा जोर वाढणार असून 15 जानेवारी रोजी मतदान आणि 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. यंदा महापालिका निवडणुकीत 22 प्रभागांमधून एकूण 87 नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. या निवडणुकीत महिला प्रतिनिधित्व मोठ्या प्रमाणात दिसून येणार आहे. एकूण 87 जागांपैकी 47 जागा खुल्या प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आल्या असून त्यापैकी 23 जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. याशिवाय अनुसूचित जातींसाठी 15, अनुसूचित जमातींसाठी 2 आणि नागरिक मागास प्रवर्गासाठी 23 जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. आरक्षणाच्या या समीकरणामुळे अनेक प्रभागांमध्ये इच्छुकांची संख्या वाढलेली दिसून येत आहे. निवडणूक जाहीर होताच काही तासांतच इच्छुक उमेदवार आणि माजी नगरसेवक प्रचारात उतरले आहेत. समाजमाध्यमांवरून जनतेशी संपर्क साधण्यास सुरुवात झाली असून प्रत्यक्ष प्रभागांमध्येही भेटीगाठींना वेग आला आहे. चौकाचौकांत, वस्त्यांमध्ये आणि बाजारपेठांमध्ये इच्छुक उमेदवारांची उपस्थिती वाढलेली दिसून येत आहे. निवडणूक जाहीर होईपर्यंत शांत असलेले राजकीय वातावरण आता पूर्णतः बदलले आहे.नववर्षाच्या पार्श्वभूमीवर आणि मकरसंक्रांतीच्या सणाच्या काळात ही निवडणूक होत असल्याने प्रचारातही गोड शब्दांचा वापर अधिक प्रमाणात होणार असल्याचे चित्र आहे. एकीकडे नववर्षाचा उत्साह, तर दुसरीकडे निवडणुकीची धग, अशा वातावरणात अमरावती शहर पुन्हा एकदा राजकीय केंद्रबिंदू ठरणार आहे. येत्या काही दिवसांत प्रचार अधिक तीव्र होणार असून, प्रत्येक प्रभागात चुरशीची लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. सरकारी कार्यक्रम आणि भूमिपूजनावर बदल…-पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुले यांच्या हस्ते पट्टे वितरण कार्यक्रमाची वेळ अचानक बदलून 3 वाजता करण्यात आली. गोपाल नगर अंडर बायपासवरील भूमिपूजन कार्यक्रम विधायक रवि राणाने सकाळीच पूर्ण केला.विधायक सुलभा खोडके व संजय खोडके यांनी नियोजित कार्यक्रम वेळेपूर्वी संपवले.या बदलांमुळे सर्व सरकारी कार्यक्रम आणि राजकीय कार्यक्रम आचारसंहितेच्या अधीन झाले.




