महापालिकेचा तपासात ढिसाळपणा, पोलिसांचा गंभीर आरोप

बनावट जन्म-मृत्यू प्रमाणपत्र प्रकरण

अमरावती /15 डिसेंबर : शहरातील बनावट जन्म व मृत्यू प्रमाणपत्र प्रकरणात महापालिकेनेच गुन्हे दाखल करूनही प्रत्यक्ष तपासात पोलिसांना आवश्यक सहकार्य दिले जात नसल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी अत्यावश्यक कागदपत्रे उपलब्ध करून दिली जात नसल्याने तपास संथगतीने सुरू असल्याची तक्रार शहर कोतवाली पोलिसांनी थेट महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे केली आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागांतर्गत कार्यरत जन्म-मृत्यू नोंदणी विभागातून बनावट कागदपत्रांच्या आधारे उशिरा प्रमाणपत्रे मिळवून शासनाची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर, तब्बल 504 जणांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र, या गंभीर प्रकरणात महापालिकेच्या प्रशासनिक उदासीनतेमुळे पोलिस तपासाला अडथळे निर्माण होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शहर कोतवाली पोलिस ठाण्याचे तपास अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक आडे यांनी महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकार्‍यांना पत्र लिहून तपासासाठी आवश्यक असलेली अचूक नावाच्या आदेशाची छायाप्रत अद्याप प्राप्त न झाल्याची बाब निदर्शनास आणून दिली आहे. तहसील कार्यालयामार्फत जारी करण्यात आलेल्या या आदेशाची प्रत तपासासाठी अत्यावश्यक असून, ती नसल्यामुळे गुन्ह्याचा मागोवा घेणे कठीण होत आहे.
पोलिसांचे पत्र प्राप्त झाल्यानंतर वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे यांनी 12 डिसेंबर रोजी जन्म-मृत्यू विभागाच्या वैद्यकीय अधिकारी व उपनिबंधक डॉ. प्रतिभा आत्राम, तसेच कनिष्ठ लिपिक रजनी उके आणि शालिनी पखाले यांना पत्र पाठवून संबंधित आदेशाची छायाप्रत तातडीने पोलिसांकडे सादर करण्याचे निर्देश दिले. मात्र, अक्षरशः कागदपत्रांच्या खेळात तपास रखडत असल्याची स्थिती आहे. विशेष म्हणजे, ज्या प्रकरणात महापालिकेने स्वतः तक्रार दाखल केली आहे, त्याच प्रकरणाच्या तपासात पोलिसांना पुरेसे सहकार्य मिळत नसल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबत संशयाची छाया निर्माण झाली असून, तपास लांबवण्यामागे नेमका उद्देश काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अतिरिक्त आयुक्तांच्या अहवालाकडे लक्ष

बनावट जन्म-मृत्यू प्रमाणपत्र प्रकरणात दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी खासदार बलवंत वानखडे यांनी महापालिका आयुक्त सौम्या शर्मा यांच्याकडे केली होती. त्यानुसार आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्याकडे सोपवली. चौकशी पूर्ण करून त्यांनी गेल्या आठवड्यात अहवाल सादर केला असून, त्यात जन्म-मृत्यू नोंदणीचे निबंधक, उपनिबंधक तसेच एका कनिष्ठ लिपिकाविरुद्ध कारवाईचा प्रस्ताव आहे. आता या अहवालाच्या आधारे आयुक्त सौम्या शर्मा काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

504 जणांविरुद्ध गुन्हे दाखल

वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे यांच्या तक्रारीवरून 29 ऑक्टोबर रोजी बनावट कागदपत्रांच्या आधारे जन्म व मृत्यू प्रमाणपत्रे मिळवून शासनाची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली 504 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. शहर कोतवाली पोलिसांनी या तक्रारीच्या आधारे फौजदारी गुन्हे नोंदवून तपास सुरू केला आहे. एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने आरोपी असलेले हे प्रकरण शहरातील प्रशासकीय व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे ठरले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button