मनपाची प्रतिबंधित प्लास्टिकविरोधात धडक कारवाई
1270 किलो प्रतिबंधित प्लॅस्टिक जप्त-नियमभंग करणार्यांवर दंडात्मक कार्यवाही

अमरावती /28 डिसेंबर : आयुक्त सौम्या शर्मा व अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या ठोस मार्गदर्शनाखाली व प्रत्यक्ष नेतृत्वाखाली अमरावती महानगरपालिकेमार्फत शहरात प्रतिबंधित प्लॅस्टिकविरोधात जोरदार मोहीम राबविण्यात येत आहे.
या मोहिमेअंतर्गत 27 डिसेंबर 2025 रोजी रात्री 8.00 वाजता कडवी बाजार परिसरातील श्री. कृष्ण मिनी ट्रान्सपोर्ट येथे अचानक छापा टाकून दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईत सदर ठिकाणाहून 1270 किलो प्रतिबंधित प्लॅस्टिक साहित्य जप्त करण्यात आले असून संबंधितांकडून नियमानुसार 5,000/- इतका पहिला दंड वसूल करण्यात आला आहे. याच मोहिमेअंतर्गत माहुली ट्रान्सपोर्ट, बालाजी ट्रान्सपोर्ट व कोहिनूर ट्रान्सपोर्ट येथेही सखोल तपासणी करण्यात आली असून प्लॅस्टिक साठा व वाहतुकीबाबत कडक सूचना देण्यात आल्या. या संपूर्ण कार्यवाहीदरम्यान अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून कारवाईचे प्रभावी नियोजन, मार्गदर्शन व नियंत्रण केले. त्यांच्या नेतृत्वामुळे ही कारवाई अत्यंत शिस्तबद्ध, पारदर्शक आणि परिणामकारक ठरली.सदर कारवाईत प्लॅस्टिक कारवाई नोडल अधिकारी विनोद टांक, स्वच्छ भारत मिशन शहर समन्वयक श्वेता बोके, स्वास्थ निरीक्षक सोपान माहुलकर, मिथुन चावरे, श्री. दर्शन देशमुख, कोल्हे तसेच अतिक्रमण विभागाची संपूर्ण टीम सक्रियपणे सहभागी होती. अमरावती महानगरपालिकेमार्फत शहरात प्रतिबंधित प्लॅस्टिकचा वापर, साठा व वाहतूक करणार्यांविरोधात यापुढेही कडक, सातत्यपूर्ण व धडक कारवाया राबविण्यात येणार असून नियमभंग करणार्यांवर कोणतीही तडजोड न करता कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.




