आता महापालिकेचा शहरातील पार्किंग सुधारणेवर भर

जागा निश्चितीसाठी आयुक्तांचे निर्देश

-फुटपाथ मोकळे करण्याच्या कार्यवाहीला गती
अमरावती / 17 जुलै : अमरावती शहरात गंभीर बनत चाललेल्या रहदारीच्या समस्येवर नियंत्रण मिळवून वाहतूक व्यवस्थेला वळन लावण्यासाठी महापालिका आयुक्त सौम्या शर्मा गांभीर्याने पाउले उचलून उपाययोजना आखत असताना आता त्यांनी शहरातील वाहनांच्या पर्किंगचा प्रश्न निकाली काढण्यासाठी लक्ष्य केंद्रित केले आहे. शहरात पार्किंग झोन निश्चित करण्याचे निर्देश मनपा आयुक्तांनी प्रशासनाला दिले आहेत.
शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडण्यासाठी फेरीवाले, अनधिकृत अतिक्रमने कारणीभूत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सौम्या शर्मा यांच्या आदेशावरुन महापालिका प्रशासनाकडून सध्या सर्वत्र अतिक्रमन निर्मूलनाची मोहिम धडाक्यात सुरु आहे. सोबतच फुटपाथ अडवून व्यवसाय करणार्‍या व्यावसायिकांवरही महापालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारल्याचे पाहायला मिळत आहे. त्यासाठी विशेष मोहिमच हाती घेण्यात आली आहे. दरम्यान शहरात वाहनांच्या पार्किंगची समस्याही गंभीर असल्याचे आयुक्तांच्या लक्षात आले. त्यावर उपाय म्हणून वाहने उभी करण्यासाठी जागा उपलब्ध करुन पार्किंग झोन निश्चित करण्याचे निर्देश मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले आहे.
मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांनी सध्या ठिकठिकाणी प्रत्यक्ष भेटी देवून समस्या जाणून घेण्याचा आणि त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचा धडाका लावला आहे. आज त्यांनी वर्दळीच्या अंबादेवी मंदिर परिसराची पाहणी केली. तेव्हा येथे वाहनतळ नसल्याने वाहनचालक आपली वाहने जागा मिळेल तेथे अस्ताव्यस्त पद्धतीने आपली वाहने उभी करतात. ही वाहने वाहतूकीस अडथळा ठरत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत माहिती घेतली असता, शहरात अन्य भागातही पार्किंगचे असेच विदारक चित्र असल्याचे त्यांना समजले. ही बाबा गांभीर्याने घेत शर्मा यांनी अतिक्रमने हटवून त्याठिकाणी तातडीने शहरात पार्किंगसाठी जागा निश्चित करण्याचे आदेश अधिकार्‍यांना दिले.
मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांनी स्पष्ट केले की, शहरात लोकसंख्या वाढीसोबतच वाहनांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात भर पडली आहे. त्यामुळे नियोजनबद्ध पद्धतीने उपाय योजले जाणे आवश्यक आहे. त्यानुसार फेरीवाल्यांसाठी निश्चित हॉकर्स झोन, वाहनांसाठी पार्किंगची सुविधा, वाहतूक नियमांबाबत आधुनिक तंत्राचे ज्ञान याची अंमलबजावणी करावी लागेल, असे यावेळी सौम्या शर्मा म्हणाल्या. दुकानांसमोर मनपाच्या जागेत अतिक्रमन करुन करण्यात आलेले कच्चे व पक्के बांधकाम हटविण्याबाबत संबंधितांना नोटिस देण्याची कार्यवाही लवकरच पार पाडली जाणार असल्याचे शर्मा यांनी सांगितले. शहरवासीयांना सुरक्षित आणि अनुशासित वाहतूक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आवश्यक पाउले उचलण्यावर महापालिकेचा भर असल्याचे त्या म्हणाल्या.
शहरातील मुख्य मार्गांवरील अतिक्रमने हटविण्याला प्राधान्य देण्याला मनपाचे प्राधान्य राहणार असून मिशन फ्री फुटपाथ मोहिमेला आणखी गती देण्यात येणार असल्याचे शर्मा यांनी सांगितले. उड्डाणपूलांखाली मोकळ्या जागेत नियोजन करुन पार्किंगची व्यवस्था करण्यात येईल. तेसेच कोणतेही बांधकाम करताना पार्किंगसाठी जागा आरक्षित ठेवणे अनिवार्य राहणार आहे. त्याचे काटेकोर पालन आवश्यक आहे. अन्यथा बांधकामाला परवानगी नाकारली जाईल, असे शर्मा यांनी स्पष्ट केले. हॉकर्स झोन निश्चित करण्यासोबतच नो हॉकर्स झोन ठरविण्यालाची प्रक्रियाही सुरु करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. रस्त्याच्या कडेला असलेले गटई खोके हटविण्याबाबत दिशानिर्देश देण्यात आल्याचेही त्या म्हणाल्या.

संबंधित बातम्या

Back to top button