मनपात पत्रकारांसाठी ई.व्ही.एम. प्रणालीचे प्रात्यक्षिक

आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांचे मतदारांना महत्त्वपूर्ण सूचना व मतदानासाठी आवाहन

अमरावती /9 जानेवारी : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 ची अधिकृत घोषणा झाल्यानंतर दिनांक 15 डिसेंबर 2025 पासून संपूर्ण अमरावती शहरात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. येत्या दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी होणार्‍या या महत्त्वाच्या निवडणुकीसाठी प्रशासनाकडून व्यापक तयारी सुरू असून, मतदारांना मतदान प्रक्रियेबाबत योग्य व सुस्पष्ट माहिती मिळावी यासाठी विविध जनजागृती उपक्रम राबविले जात आहेत.
यंदाच्या निवडणुकीचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक मतदाराला प्रभागांनुसार चार स्वतंत्र मते नोंदवावी लागणार आहेत. ही मतदान पद्धत अमरावती शहरातील मतदारांसाठी कोणताही संभ्रम, गैरसमज किंवा तांत्रिक अडचण निर्माण होऊ नये, तसेच मतदान प्रक्रिया सुलभ, पारदर्शक व विश्वासार्ह व्हावी, या उद्देशाने अमरावती महानगरपालिकेने विशेष खबरदारी घेतली आहे.
मतदारांपर्यंत अचूक माहिती पोहोचविण्यात माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याने, पत्रकार व वृत्तसंस्थांच्या प्रतिनिधींना इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ई.व्ही.एम.) बाबत प्रत्यक्ष अनुभव मिळावा, या हेतूने ई.व्ही.एम. मशिनचा प्रात्यक्षिक डेमो आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार 9 जानेवारी 2026 रोजी दुपारी ठीक 1.00 वाजता, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, अमरावती महानगरपालिका येथे हा प्रात्यक्षिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. या डेमोमध्ये अधिकार्‍यांनी ई.व्ही.एम. मशिनद्वारे चार मते कशा प्रकारे नोंदवायची, मतदान करताना कोणत्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे तसेच संपूर्ण मतदान प्रक्रिया टप्प्याटप्प्याने कशी पार पडते, याची सविस्तर माहिती दिली.
मतपत्रिकेवरील उमेदवारांची ओळख अधिक सोपी व्हावी यासाठी बॅलेट पेपरचे रंग गटनिहाय निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार-
अ गटासाठी : पांढरा रंग
ब गटासाठी : फिक्कट गुलाबी रंग
क गटासाठी : फिक्कट पिवळा रंग
ड गटासाठी : फिक्कट निळा रंग अशी माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमास उपायुक्त दादाराव डोल्हारकर, अमरावती शहरातील सर्व प्रमुख पत्रकार, विविध वृत्तसंस्थांचे प्रतिनिधी, तसेच निवडणूक प्रक्रियेबाबत माहिती घेण्यास इच्छुक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित पत्रकारांनी प्रत्यक्ष ई.व्ही.एम. हाताळून मतदान प्रक्रिया अनुभवली व चार मत प्रणालीबाबत सखोल माहिती घेतली. यावेळी उपस्थितांनी प्रशासनाच्या या उपक्रमाचे कौतुक करत, ही माहिती नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा विश्वास व्यक्त केला. अमरावती महानगर पालिकेच्या वतीने शहरातील सर्व मतदारांना आवाहन करण्यात आले आहे की, 15 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7.30 ते 5.30 यावेळेत निर्भयपणे, योग्य पद्धतीने चारही मते नोंदवून लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा. योग्य माहिती, जनजागृती आणि पारदर्शक व्यवस्थेमुळे ही निवडणूक आदर्श ठरेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी सांगितले की, निवडणूक प्रक्रिया ही लोकशाहीचा कणा आहे. चार मत प्रणाली असली तरी योग्य माहिती व जनजागृतीच्या माध्यमातून प्रत्येक मतदार सक्षमपणे मतदान करू शकतो. माध्यमांनी ही माहिती अचूकपणे नागरिकांपर्यंत पोहोचवावी, जेणेकरून कोणताही संभ्रम न राहता शांततेत व पारदर्शक पद्धतीने मतदान प्रक्रिया पूर्ण होईल. आयुक्तांनी महत्त्वपूर्ण सूचना केल्या की, मतदान केंद्रावर जाताना मतदारांनी आपली ओळख पटविण्यासाठी वैध मतदार ओळखपत्र किंवा निवडणूक आयोगाने मान्य केलेले ओळखपत्र सोबत ठेवावे. ई.व्ही.एम. मशिनवर मतदान करताना प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र बटन दाबून चारही मते नोंदविणे आवश्यक आहे. मतदान केंद्रात शिस्त, शांतता व सुरक्षिततेचे नियम पाळावेत तसेच निवडणूक कर्मचार्‍यांना सहकार्य करावे. आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे व कोणत्याही प्रकारच्या अफवा, गैरसमज किंवा अपप्रचारास बळी पडू नये. आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी शहरातील सर्व पात्र मतदारांना आवाहन केले की, मतदान हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आणि कर्तव्य आहे. चार मत प्रणालीबाबत कोणताही संभ्रम न ठेवता, योग्य माहिती घेऊन निर्भयपणे मतदान करावे. आपले एक-एक मत शहराच्या विकासाची दिशा ठरविणारे आहे. तसेच माध्यम प्रतिनिधींनी प्रशासनाकडून दिली जाणारी अधिकृत व अचूक माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवावी, जेणेकरून मतदान प्रक्रिया पारदर्शक व विश्वासार्ह होईल, असेही त्यांनी नमूद केले.

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button