अमरावती महापालिकेत (शिंदे) शिवसेनेचाच महापौर बसणार

मंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केला विजयाचा ठाम विश्वास

* विकासाच्या मुद्यांवर शिवसेना शहरात पूर्ण बहुमताने येणार

अमरावती /11 जानेवारी – महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेनेने (शिंदे गट) विजयाचा निर्धार केला असून, यावेळेस पूर्ण बहुमतासह सत्ता काबीज करू आणि महापौरही शिवसेनेचाच होईल, असा ठाम विश्वास राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केला आहे. ‘आपली मातृभूमी’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी अमरावतीमधील राजकीय समीकरणांवर सविस्तर भाष्य केले. प्रचारासाठी अमरावतीत दाखल झालेले मंत्री संजय राठोड म्हणाले की, सध्या शहरात शिवसेनेसाठी अत्यंत अनुकूल वातावरण आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेली विकासकामे आणि घेतलेले लोकहिताचे निर्णय यामुळे जनतेचा कल शिवसेनेकडे झुकला आहे. केवळ पोकळ घोषणाबाजी करणार्‍या विरोधकांना जनता या निवडणुकीत नाकारेल. प्रत्येक प्रभागात शिवसैनिकांनी बांधणी केली असून मतदारांचा प्रतिसाद अभूतपूर्व आहे. भाजपासोबतच्या युतीबाबत स्पष्टीकरण देताना राठोड यांनी सांगितले की, आम्ही सर्वेक्षणाच्या जोरावर 30 जागा मागितल्या होत्या आणि 23 जागांवर तडजोड करण्यासही तयार होतो. मात्र, स्थानिक भाजपा नेतृत्व आम्हाला 15-16 पेक्षा जास्त जागा देण्यास तयार नसल्याने चर्चा यशस्वी होऊ शकली नाही. यामुळेच आम्ही स्वबळावर 67 जागांवर उमेदवार दिले असून, आज प्रत्येक प्रभागात शिवसेना हीच प्रमुख स्पर्धक म्हणून समोर आली आहे. अमरावतीच्या विकासासाठी राज्यात आणि महापालिकेत एकाच विचाराची सत्ता असणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे नगरविकास आणि गृहनिर्माण यांसारखी महत्त्वाची मंत्रालये असल्याने, महापालिकेत शिवसेनेची सत्ता आल्यास शहराच्या विकासाला मोठा निधी मिळेल, हे मतदारांना ठाऊक आहे. त्यामुळेच, ही निवडणूक शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी निर्णायक ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.

जागावाटपाचा पेच आणि शिवसेनेची रणनीती

शिवसेनेने सर्वेक्षणाच्या आधारे 23 जागांचा प्रस्ताव देऊनही भाजपने केवळ 15 ते 16 जागांचा आग्रह धरल्याने युतीची चर्चा अंतिम टप्प्यात फिस्कटली. परिणामी, सन्मान राखण्यासाठी शिवसेनेने स्वबळाचा नारा देत 67 उमेदवार मैदानात उतरवले आहेत. आज सर्वच प्रमुख पक्ष शिवसेनेलाच आपला मुख्य प्रतिस्पर्धी मानत असल्याने शिंदे गटाची ताकद शहरात किती वाढली आहे, हे स्पष्टपणे दिसून येत आहे.

संबंधित बातम्या

Back to top button