बोली जिवंत तरच मराठी भाषा समृद्ध राहील
कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावकर यांचे प्रतिपादन

अमरावती/25 जानेवारी – मराठी भाषेचे खरे सामर्थ्य तिच्या प्रमाणभाषेत नव्हे, तर तिच्या विविध बोलींमध्ये दडलेले आहे. बोली टिकल्या तरच भाषा जिवंत राहते आणि पुढील पिढीपर्यंत तिचा वारसा पोहोचतो, असे ठामपणे नमूद केले. बोलीभाषांमधून लोकजीवन, संस्कृती, मूल्ये आणि इतिहास यांचे प्रतिबिंब उमटते. त्यामुळे बोलीभाषांचे शास्त्रीय अध्ययन, दस्तऐवजीकरण आणि विद्यापीठीय पातळीवर संशोधन होणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावकर यांनी केले. मराठी भाषेच्या विविध बोलींचे जतन, संवर्धन व संरक्षण या उद्देशाने भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुरस्कृत आणि मराठी भाषा विद्यापीठ, रिद्धपूर आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा या निमित्ताने ‘बोलींचा जागर’ हा विशेष कार्यक्रम मराठी भाषा विद्यापीठ, रिद्धपूर (अमरावती) येथे मोठ्या उत्साहात व अभ्यासपूर्ण वातावरणात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. मराठी ज्ञानपरंपरेचे प्रतीक असलेल्या ग्रंथदिंडीने कार्यक्रमाची भारदस्त व संस्कारक्षम सुरुवात झाली. परंपरा, संस्कृती आणि बोलीवैभव यांचा सुरेख संगम साधणारी ही ग्रंथदिंडी उपस्थितांच्या मनावर विशेष ठसा उमटवून गेली. मराठी भाषेच्या समृद्ध बोलीपरंपरेचे दर्शन घडवणार्याड या कार्यक्रमात कोकणी, वर्हानडी, ठाकर, कोरकू आदी बोलींच्या लोककलांचे सादरीकरण, बोलीभाषांवरील संवाद सत्रे तसेच अभ्यासकांचे सखोल मार्गदर्शन यामुळे उपस्थितांना महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा जिवंत अनुभव घेता आला.




