एसटीचा बेजबाबदार कारभार
शिरजगाव मोझरी मार्गावर बसचा पत्ताच नाही

* विद्यार्थी आणि ग्रामस्थांचे रात्री उशिरापर्यंत अतोनात हाल
अमरावती / 8 फेब्रुवारी : शिरजगाव – मोझरी मार्गावर धावणार्या राज्य परिवहन महामंडळाच्या बस सेवेचा पुरता बोजवारा उडाला असून, रात्रीच्या वेळी दीड-दीड तास वाट पाहूनही बस येत नसल्याने विद्यार्थी आणि प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. शेवटची बस वेळेवर न सुटल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण असून प्रशासनाच्या या हलगर्जीपणाविरोधात आता ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
शिरजगाव मोझरी येथील बस स्थानकावर दररोज रात्री प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. विशेषतः रात्री 8 वाजताची बस 10 वाजेपर्यंत येत नाही, ही आता नित्याचीच बाब झाली आहे. ही शेवटची बस असल्याने प्रवाशांकडे दुसरा कोणताही मार्ग उरत नाही. शिक्षण आणि कामासाठी शहरात गेलेल्या विद्यार्थ्यांना यामुळे मध्यरात्री घरी पोहोचावे लागत आहे. प्रशासनाला वारंवार निवेदने देऊनही कोणतीही सुधारणा झालेली नाही. महामंडळाच्या या आडमुठ्या धोरणामुळे ग्रामीण भागातील जनतेचा संयम आता सुटत चालला आहे. प्रवाशांच्या जिवाशी खेळणे थांबवून बसची वेळ पाळावी, अशी मागणी जोर धरत आहे.
प्रशासनाचा निष्काळजीपणा आणि संतप्त गाव-शिरजगाव मोझरी मार्गावर बस सेवा विस्कळीत झाल्याने सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. रात्रीच्या अंधारात ताटकळत उभे राहणार्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने त्वरित दखल न घेतल्यास संतप्त नागरिक आणि प्रवासी आता रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत.




