सदाचारासाठी गुरूंचे मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचे
जितेंद्रनाथ महाराज यांचे प्रतिपादन

* पी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपमध्ये महापारायण सोहळ्याची सांगता
अमरावती /18 जानेवारी : मनुष्य जन्म एकदाच मिळतो आणि तो सत्कार्यासाठी उपयोगात यावा. मात्र योग्य दिशा व संस्कार न मिळाल्यास जीवन भरकटते. जीवनाला योग्य वळण देण्यासाठी गुरूंचे मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचे असून, त्यांच्या मार्गदर्शनातून जीवनात आमूलाग्र बदल घडू शकतो, असे प्रतिपादन श्री देवनाथ पीठाधीश्वर परमपूज्य आचार्य श्री जितेंद्रनाथ महाराज यांनी केले. पी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुप येथे आयोजित श्री संत गजानन महाराज महापारायण सोहळ्याच्या समारोपीय (सांगता) समारंभात ते बोलत होते. यावेळी त्यांनी अध्यात्म, सदाचार, संस्कार व जीवनातील योग्य मार्ग यांचे महत्त्व उपस्थित भाविकांना समजावून सांगितले.
या प्रसंगी महाराजांच्या शुभहस्ते संस्थेचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री प्रविण पोटे पाटील, सौ अनुराधाताई पोटे पाटील, श्रेयशदादा पोटे पाटील, प्रविण मोहोड, मुखोद्गत वाचक विद्याताई पडवळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुप द्वारा प्रकाशित, श्री गजानन विजय ग्रंथातील संदर्भांवर आधारित संत श्री गजानन महाराजांच्या जीवनकथेवरील श्री गजानन कथानक या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले या पुस्तकाचे लेखन श्रीमती तारा प्रद्युम्न देशपांडे व डॉ. सौ. गौरी योगेश बनसोड यांनी केले आहे. संपादनाची जबाबदारी विवेक कवठेकर यांनी पार पाडली असून, कथाचित्रण प्रा. अजय रायबोले यांनी केले आहे. मुखपृष्ठाची आकर्षक रचना प्रा. भूपेंद्र जयस्वाल यांनी केली आहे.
शनिवार, 17 जानेवारी 2026 रोजी पी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुप येथे पार पडलेल्या या महापारायण सोहळा व पुस्तक प्रकाशन कार्यक्रमास शैक्षणिक, सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसर भक्तिमय व आध्यात्मिक वातावरणाने भारावून गेला होता.




