आज पालकमंत्री घेणार विकासकामांचा आढावा

अंबादेवी संस्थानाचा आराखडा तयार

* मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांनी केली प्रत्यक्ष पाहणी

अमरावती /6 मार्च – विदर्भाची कुलस्वामिनी आई अंबादेवी आणि एकविरा देवी संस्थानच्या परिसराचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलणार असून 355 कोटी रुपयांचा एक भव्य विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी गुरुवारी दोन्ही मंदिर परिसराचा दौरा केला.
यावेळी त्यांनी भाविकांची वाढती गर्दी, वाहतुकीची कोंडी आणि प्रस्तावित सोयीसुविधांबाबत सविस्तर माहिती घेतली. एमएसएसआयडीसीचे वास्तु विशारद पागृत आणि अभियंता भिवगडे यांनीही यापूर्वीच परिसराचे निरीक्षण करून बदलांबाबत अहवाल दिला आहे. या आराखड्यात भव्य प्रवेशद्वार, भाविकांसाठी सुलभ दर्शन रांगा, मंदिर परिसराचे सुशोभीकरण आणि पार्किंगसाठी बहुमजली व्यवस्थेचा समावेश आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी बुधवारी झालेल्या बैठकीत या प्रकल्पाबाबत प्राथमिक चर्चा केली असून परिसरातील जमीन अधिग्रहणाबाबतही हालचाली सुरू झाल्या आहेत. आयुक्तांनी यावेळी संबंधित अधिकार्‍यांना हे सर्व काम नियोजनबद्ध पद्धतीने करण्याचे आदेश दिले आहेत. या विकास प्रकल्पामुळे मंदिराचे पावित्र्य आणि भव्यता अधिक वाढणार असून भाविकांना दर्शनासाठी कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. विशेष म्हणजे, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उद्या 7 मार्च रोजी अमरावती दौर्‍यावर येत असून ते या 355 कोटींच्या आराखड्याची अंतिम समीक्षा करण्याची शक्यता आहे. पालकमंत्र्यांच्या या दौर्‍याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

भक्तांच्या सुविधेसाठी नवे पाऊल

अंबादेवी मंदिर परिसरात येणार्‍या भाविकांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याने राहण्याची सोय आणि गाड्या लावण्यासाठी मोठी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. जुन्या रचनेत बदल करून हा परिसर अधिक देखणा आणि विस्तीर्ण करण्याचा प्रशासनाचा मानस असून यामुळे अमरावतीच्या वैभवात मोठी भर पडणार आहे.

संबंधित बातम्या

Back to top button