भाजप-शिंदे सेना युतीची पहिली औपचारिक बैठक

शिंदे सेनेने मागितल्या 15 जागा

मनपा जागावाटपावर सविस्तर चर्चा

अमरावती /14 डिसेंबर : आगामी अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला असून भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील युतीची प्रक्रिया निर्णायक टप्प्यात पोहोचल्याचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना (शिंदे गट) प्रमुख आनंदराव अडसूळ यांचे रविवारी सायंकाळी सहा वाजता अमरावती शहरात आगमन होताच त्यांनी थेट निवडणूक रणनीतीवर चर्चा करण्यास सुरुवात केली.अडसूळ यांनी आपले सहकारी माजी आ.ज्ञानेश्वर धाने पाटील व आ.संजय देशमुख यांच्यासह भाजपचे अमरावतीतील प्रमुख नेतृत्व, आमदार संजय कुटे व जयंत डेहनकर यांच्याशी सविस्तर चर्चा केली. ही बैठक आगामी अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने भाजप आणि शिंदे गटातील पहिली औपचारिक बैठक ठरली आहे.या बैठकीत प्रामुख्याने महापालिका निवडणुकीतील जागावाटप, निवडणूक रणनीती, समन्वय यंत्रणा आणि संयुक्त प्रचार यावर सखोल चर्चा झाली. यावेळी शिंदे गटाचे प्रमुख आनंदराव अडसूळ यांनी स्पष्ट भूमिका मांडत शिवसेनेला महापालिकेत सन्मानजनक प्रतिनिधित्व अपेक्षित असल्याचे सांगितले. शिवसेनेला किमान पंधरा जागा पूर्ण स्वरूपात देण्यात याव्यात, असा ठाम दावा त्यांनी चर्चेदरम्यान केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते.या चर्चेदरम्यान दोन्ही पक्षांतील नेत्यांमध्ये सकारात्मक वातावरण पाहायला मिळाले. मतभेदांपेक्षा सामंजस्यावर भर देण्यात आला असून निवडणूक एकत्र लढविण्याबाबत दोन्ही बाजूंनी अनुकूलता दर्शविण्यात आली आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदे सेना यांची युती जवळपास निश्चित झाल्याचे संकेत या बैठकीतून मिळत आहेत.महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेली ही बैठक केवळ प्रारंभिक असली, तरी पुढील राजकीय गणिते निश्चित करणारी ठरणार असल्याचे बोलले जात आहे. येत्या काही दिवसांत जागावाटपाबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता असून त्यानंतर संयुक्त निवडणूक रणनिती जाहीर होऊ शकते.एकूणच, अमरावती महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदे गट एकत्रितपणे मैदानात उतरण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून या युतीमुळे स्थानिक राजकारणात नवे समीकरण आकारास येत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

संबंधित बातम्या

Back to top button