दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांचा आजपासून श्रीगणेशा

जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग

अमरावती / 2 फेब्रुवारी – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नियोजनानुसार सोमवार 2 फेब्रुवारीपासून माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजेच दहावीच्या प्रात्यक्षिक, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षांना उत्साहात सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांसाठी बोर्डाच्या परीक्षेचा हा पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. ही परीक्षा 2 ते 18 फेब्रुवारी या कालावधीत मंडळाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार पार पडणार असून, याद्वारे विद्यार्थ्यांचे प्रकल्प कार्य, संवाद कौशल्य आणि प्रयोगांमधील नैपुण्य तपासले जाणार आहे. या परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी शनिवारी अमरावतीमधील शाळांमध्ये मोठी लगबग पाहायला मिळाली. मुख्य लेखी परीक्षेपूर्वी या परीक्षा होत असल्याने विद्यार्थ्यांवर काहीसा मानसिक ताण असला, तरी या प्रक्रियेमुळे अंतिम परीक्षेची दिशा स्पष्ट होत असल्याचा सूर विद्यार्थ्यांमधून उमटत आहे. दुसरीकडे, उच्च माध्यमिक अर्थात बारावीचे विद्यार्थीही अभ्यासात मग्न असून त्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा 23 जानेवारीपासून सुरू झाल्या आहेत, ज्या 9 फेब्रुवारीपर्यंत चालतील. अमरावती मधील कनिष्ठ महाविद्यालये आणि खासगी शिकवणी वर्गांमध्ये सध्या सराव परीक्षांचा वेग वाढला असून प्रत्येक विद्यार्थी यशासाठी झटत आहे. दहावीची लेखी परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान, तर बारावीची लेखी परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च या काळात दोन सत्रांत पार पडणार आहे.

संबंधित बातम्या

Back to top button