पोटच्या मुलाचा खून करणार्‍या बापाला जन्मठेप

जमिनीच्या वादातून जन्मदात्या पित्यानेच संपवले मुलाचे आयुष्य

* वरुड सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल आणि एक लाखांचा दंड

वरुड /15 जानेवारी : कौटुंबिक कलह आणि शेतीच्या वादातून जन्मदात्या बापानेच आपल्या 25 वर्षीय मुलाची हत्या केल्याची काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. वरुड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने या क्रूर कृत्याची गंभीर दखल घेत 71 वर्षीय नराधम पित्याला जन्मठेप आणि एक लाख रुपये दंडाची ऐतिहासिक शिक्षा सुनावली आहे. रक्ताच्या नात्याला काळीमा फासणार्‍या या निकालाने संपूर्ण अमरावती जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणाची पार्श्वभूमी अत्यंत दुःखद आहे. आरोपी दिलीप भाऊराव पाचपोर आणि त्याच्या पत्नीमध्ये लग्नानंतर काही काळातच खटके उडू लागल्याने, पत्नी गरोदर असतानाच आपल्या माहेरी पेठ मांगरूळी येथे निघून गेली होती. दरम्यान, पत्नीने पतीविरुद्ध उदरनिर्वाहाचा खटला दाखल केला होता. कालांतराने मुलगा दिनेश मोठा झाल्यावर, कुटुंबातील वारसदार म्हणून त्याला वडिलांच्या नावावरील ग्राम खडका येथील शेती मिळावी, अशी मागणी पत्नीने केली होती. शेती मुलाच्या नावे केल्यास उदरनिर्वाहाचा खटला मागे घेण्याचेही तिने मान्य केले होते. त्यानुसार दिनेश शेतीची देखभाल करू लागला. मात्र, 24 नोव्हेंबर 2020 रोजी शेतात गेलेल्या दिनेशवर त्याचे वडील दिलीप पाचपोर यांनी भाल्याच्या पात्याने गळ्यावर वर्मी घाव घालून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात असलेला दिनेश जीव वाचवण्यासाठी धावत बारगाव बस स्थानका पर्यंत पोहोचला. तेथील ग्रामस्थांनी त्याला पाणी पाजून मदत केली, तेव्हा त्याने माझ्या वडिलांनीच मला मारले असा हृदयद्रावक खुलासा केला. बेनोडा पोलीस ठाण्याचे तत्कालीन अधिकारी मिलिंद सरकटे आणि त्यांच्या चमूने तातडीने घटनास्थळ गाठून जखमीला उपचारासाठी हलवले, मात्र नागपूर येथे उपचारादरम्यान दिनेशचा मृत्यू झाला. वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अत्यंत सूक्ष्म तपास करून न्यायालयात सबळ पुरावे सादर केले. न्यायाधीश ए. ए. पंचभाई यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपीला मरणप्राय शिक्षेसह आर्थिक दंडही ठोठावला. हा दंड पीडित आईला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पोलीस प्रशासन आणि न्यायालयीन प्रक्रियेच्या समन्वयामुळे या निर्घृण हत्याकांडातील गुन्हेगाराला त्याच्या पापाची शिक्षा मिळाली आहे.
नराधम पित्याला कायद्याचा दणका -वरुड न्यायालयाने दिलीप पाचपोर याला जन्मठेप व सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. एक लाख रुपये दंड न भरल्यास अतिरिक्त दोन वर्षे कारावास भोगावा लागेल. ही रक्कम मृत दिनेशच्या आईला मदत म्हणून दिली जाणार आहे. बेनोडा पोलिसांनी अत्यंत कौशल्याने पुराव्यांची साखळी जुळवून गुन्हा सिद्ध केला .

संबंधित बातम्या

Back to top button