उपराईत रोजगार हमी योजनेला मोठा हादरा
बनावट ओळखीखाली वर्षानुवर्षे शासनाची फसवणूक उघड

* ग्रामसभेच्या बहुमताने रोजगार सेवकास कामावरून हटवले
दर्यापूर /4 जानेवारी : तालुक्यातील खल्लार नजिकच्या उपराई गावात रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणी दरम्यान गंभीर स्वरूपाचे गैरप्रकार समोर आल्याने ग्रामपंचायत प्रशासन हादरले आहे. शासनाची दिशाभूल करत बनावट नावाच्या आधारे कामकाज करणार्या तथाकथित रोजगार सेवकाला अखेर ग्रामसभेने बहुमताने कामावरून कमी करण्याचा ठराव मंजूर केला आहे. या प्रकरणामुळे ग्रामस्तरावर प्रशासकीय निष्काळजीपणा व जबाबदारीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. उपराई ग्रामपंचायतीत दि. 2 रोजी झालेल्या ग्रामसभेत रोजगार हमी योजनेतील अनियमितता, खोट्या नावाने काम पाहणे व शासनाची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर रोजगार सेवकास हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. संबंधित सेवकाची नियुक्ती दि. 29 एप्रिल 2011 रोजी ग्रामसभेच्या ठराव क्रमांक 6/1 नुसार अतुल वामन खंडारे या नावाने करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात कामकाज पाहणारी व्यक्ती ही विनायक वामन खंडारे असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. विनायक खंडारे या नावाचा ग्रामसभेच्या कोणत्याही ठरावात अथवा नोंदीत उल्लेख नसल्याने संपूर्ण नियुक्ती प्रक्रियेवरच संशयाची छाया निर्माण झाली. नियुक्तीनंतर सुरुवातीपासूनच रोजगार हमीच्या कामांमध्ये गैरप्रकार सुरू असल्याच्या तक्रारी गावकर्यांकडून होत होत्या. याबाबत नागरिकांनी थेट जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रारी करून सातत्याने पाठपुरावा केला. या तक्रारींची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी सखोल चौकशी केली असता शासनाची जाणीवपूर्वक दिशाभूल केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर संबंधित रोजगार सेवक विनायक खंडारे याला कामावरून कमी करण्याचे आदेश दि. 9 सप्टेंबर 2021 रोजीच निर्गमित करण्यात आले होते. तरीही पाच वर्षांचा कालावधी उलटूनसुद्धा कोणाच्या आशीर्वादाने हा बनावट रोजगार सेवक कार्यरत राहिला, असा संतप्त सवाल ग्रामस्थांमधून उपस्थित केला जात आहे. तत्कालीन गट विकास अधिकारी तसेच तत्कालीन सरपंच व सचिव यांनी वेळेत कारवाई का केली नाही, याबाबतही चौकशीची मागणी होत आहे. मुख्य कार्यकारी अधिकार्यांच्या आदेशानुसार ग्रामपंचायतीने दि. 28 नोव्हेंबर व दि. 24 डिसेंबर रोजी झालेल्या मासिक सभांमध्ये रोजगार सेवकास कामावरून कमी करण्याचे ठराव मंजूर केले होते. अखेर दि. 2 रोजी झालेल्या विशेष ग्रामसभेत मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी बहुमत सिद्ध करून गैरप्रकार करणार्या रोजगार सेवकाला कायमस्वरूपी कामावरून हटवले. या निर्णयानंतर सरपंच निरज नागे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, रोजगार सेवकाकडून सुरुवातीपासूनच अनियमितता सुरू होती. नागरिकांच्या तक्रारीनंतर शासनाची फसवणूक झाल्याचे सिद्ध झाल्याने ग्रामसभेत बहुसंख्य ग्रामस्थांच्या उपस्थितीत त्याला कामावरून कमी करण्यात आले. दरम्यान, नागरिक सुजित सुरवाडे यांनी 2011 ते 2025 या कालावधीत घेतलेले सर्व मानधन वसूल करून संबंधित व्यक्तीवर राज्य घटनेनुसार फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. ग्रामस्थ व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त निर्णयानुसार रोजगार सेवकास कामावरून कमी करण्याचा ठराव पारित झाल्याची माहिती ग्रामपंचायत सचिव पी. पी. पाचघरे यांनी दिली आहे. या घटनेमुळे रोजगार हमी योजनेतील पारदर्शकता व देखरेखीबाबत प्रशासनावर कठोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.




