अभिजात मराठी भाषा परिषद देशाच्या दृष्टीने महत्त्वाची
मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांचे प्रतिपादन

अमरावती /6 ऑक्टोबर : प्रत्येक भाषेने आपली अस्मिता उभी केली आहे, त्यामुळे ही अस्मिता अखंडपणे पुढे न्यायची असल्यास देशातील अभिजात भाषेचे महत्त्व अधोरेखित करावे लागणार आहे. अशा दृष्टीने अमरावती येथे आयोजित होणारी पहिली अभिजात मराठी भाषा परिषद देशासाठी महत्त्वाची ठरणार आहे, असे मत मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी व्यक्त केले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात ही अभिजात मराठी भाषा परिषद आयोजित करण्यात आली असून, यावेळी डॉ. सामंत यांनी भेट दिली. परिषदेच्या कार्यक्रमात मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अविनाश आवळ गावकर, मराठी भाषा विभागाचे सचिव किरण कुलकर्णी, मधुकर जोशी आदी उपस्थित होते.
डॉ. सामंत यांनी सांगितले की, परिषदेच्या निमित्ताने देशभरातील विद्वान एकत्रित झाले आहेत, ज्यांच्या ज्ञानामुळे अभिजात भाषांना नवी दिशा मिळणार आहे. येथे खर्या अर्थाने 11 अभिजात भाषांचा संवाद होत असून, अखंड भारतात विविध बोलीभाषा बोलल्या जातात आणि त्याचे रूपांतर बोलीभाषेत होते. कोकणी भाषेबाबतही असेच झाले आहे. प्रत्येक भाषेचा सन्मान व्हावा, मातृभाषा ही अभिमानाची असून ती बोलता येणे आणि भावना व्यक्त होणे आवश्यक आहे. अभिजात भाषा परिषद विद्यार्थ्यांसमोर होणे गरजेचे असून, यातून त्यांना भाषेची ताकद जाणवते.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर जवाहरलाल नेहरू विद्यापीठात अध्ययन केंद्र स्थापन झाले असून, मराठी अजूनही अजरामर झाली आहे. येत्या काळात विविध भाषांमध्ये चांगले साहित्य भाषांतरित व्हावे, यासाठी अनुवाद समिती स्थापन केली जाणार आहे. आज तंजावर सारख्या भागात मराठीचे अस्तित्व आहे, आणि 400 वर्षानंतरही येथे भाषेचे अस्तित्व टिकले आहे. त्यामुळे मराठीला अग्रक्रम मिळाला आहे. तंजावर सारख्या राज्यात मराठी भाषा भवन बांधण्यासाठी शासनाने जागा उपलब्ध करून दिलेली असून, या ठिकाणी बांधकाम करण्यासाठी सहकार्य करण्यात येणार आहे. तंजावर सारखी अस्मिता आपणही उभी करावी आणि अभिजात भाषांचे कार्य अखंडपणे पुढे न्यावे, यासाठी चांगले नियोजन करावे, असे आवाहन डॉ. सामंत यांनी यावेळी केले.




