आदर्श निवासी अपंग, अस्थिव्यंग विद्यालयात जिल्हाधिकारी व सीईओंचा मायेचा स्पर्श

विद्यार्थ्यांशी हितगुज, खाऊ-साहित्य वाटप

अमरावती /25 डिसेंबर : अण्णाभाऊ साठे शिक्षण संस्था चांदुर बाजार द्वारा संचालित आदर्श निवासी अपंग अस्थिव्यंग विद्यालय टेम्ब्रुसोंडा ता चिखलदरा येथे जिल्हाधिकारी आशिष येरेकर व मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्र यांनी आकस्मिक भेट देत विद्यार्थ्यांशी अत्यंत आपुलकीने संवाद साधला. या भेटीने संपूर्ण शाळा परिसरात आनंद, आशा आणि संवेदनशीलतेचे वातावरण निर्माण झाले होते.
या वेळी अधिकार्‍यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळे हितगुज करत त्यांच्या दैनंदिन जीवनाबाबत, शिक्षणाबाबत आणि आवडी-निवडी जाणून घेतल्या. विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर उमटलेले हास्य आणि उत्साह पाहून उपस्थित अधिकारी भावूक झाले. याच भेटीत विद्यार्थ्यांना खाऊ व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. प्रशासनाने केवळ औपचारिक भेट न देता विद्यार्थ्यांसोबत स्नेह भोजनाचा आस्वाद घेत आपलेपणाची भावना व्यक्त केली.
शाळेच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने शाळेला संरक्षण भिंत व बोअरवेल उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनातर्फे आवश्यक ती मदत करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी देण्यात आले. यामुळे शाळेच्या सुरक्षिततेसह पाणीपुरवठ्याचा प्रश्नही मार्गी लागणार असल्याने शाळा प्रशासन व पालकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.या भेटीत जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह तहसीलदार जीवन मोराणकर,गट विकास अधिकारी विनोद खेडकर , गटशिक्षणाधिकारी भटेसिंग गिरासे,समाज कल्याण अधिकारी तथा जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी ज्ञानबा पुंड तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.अधिकार्‍यांनी शाळेची शैक्षणिक व्यवस्था, स्वच्छता, परिसराची पाहणी करून समाधान व्यक्त केले. तसेच शाळेतील कर्मचार्‍यांना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक मार्गदर्शन करत त्यांच्या कार्याचे कौतुक केले.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक निलेश येवले,कला शिक्षक मोहन बोबडे, वसतीगृह अधिक्षक चंद्रशेखर मेश्राम, भौतिक उपचार तज्ञ आनंद जाधव व समस्त कर्मचारी वृंद होते.

संबंधित बातम्या

Back to top button