गॅस गळती रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने ’मॉकड्रिल’वर रंगीत तालीम

अमरावती /22 डिसेंबर : कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनामार्फत आज लोणी येथील अदानी टोटल गॅस सीएनजी (भागवत पंप) केंद्रावर ’सुरक्षा लेव्हल-3 मॉकड्रिल’चे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही रंगीत तालीम पार पडली.
या मॉकड्रिलमध्ये गॅस गळतीसारखी गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास घ्यावयाची खबरदारी, सायरन वाजवून धोक्याची सूचना देणे, प्रमाणित कार्यपद्धतीचा अवलंब करणे आणि बाधितांना त्वरित प्रथमोपचार देऊन सुरक्षितस्थळी हलवणे या बाबींचे प्रत्यक्ष सादरीकरण करण्यात आले. अदानी टोटल गॅसच्या तांत्रिक पथकाने या वेळी आपत्कालीन नियोजनाचे बारकावे समजावून सांगितले. या मोहिमेत महसूल विभाग, नांदगाव खंडेश्वरचे तहसीलदार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी आणि जिल्हा शोध व बचाव पथकाचे जवान सहभागी झाले होते. तसेच अमरावती अग्निशमन विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालयाची रुग्णवाहिका यंत्रणा आणि लोणी पोलीस स्टेशनचे अधिकारी-कर्मचारी यांनी समन्वयाने काम केले. या प्रसंगी आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ, अदानी गॅसचे संचालक व व्यवस्थापक, आपदा मित्र, आपदा सखी, लोणीचे सरपंच, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशा उपक्रमांमुळे आपत्तीच्या काळात जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी यंत्रणांमधील समन्वय अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे.




