देशातील पहिले डिजिटल गाव हरीसालचं डिजिटल स्वप्न भंगलं!

हरीसाल एकेकाळचं स्वप्न, आता उदासीनतेचं प्रतीक प्रशासनाकडून थट्टा!

* ग्रामसेवक गायब – घाणीचे साम्राज्य; प्रशासनाच्या हलगर्जीपणाने गाव विकासहीन!

धारणी /12 नोव्हेंबर मेळघाटाच्या निसर्गरम्य डोंगर-दर्‍यांमध्ये वसलेले हरीसाल हे गाव कधीकाळी देशाच्या प्रगतीच्या प्रवासात एक ऐतिहासिक टप्पा ठरले होते. ‘भारताचे पहिले डिजिटल गाव’ म्हणून गौरवले गेलेले हरीसाल हे ‘डिजिटल इंडिया’ मोहिमेचे प्रतीक बनले होते. संपूर्ण देशाचे लक्ष या छोट्याशा गावाकडे वेधले गेले होते. परंतु आज तेच हरीसाल पुन्हा अंधारात लोटले गेले असून, विकासाचा दीप मंदावला आहे.
एकेकाळी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्रामीण भारतात क्रांती घडविण्याचे स्वप्न पाहिलेले हे गाव आज निष्क्रियतेच्या गर्तेत बुडाले आहे. गावात ना स्वच्छतेचा मागमूस, ना ग्रामसेवकाचे अस्तित्व. ग्रामपंचायतीची कामे ठप्प पडली आहेत, तर नागरिकांना मूलभूत सुविधांसाठीही दररोज संघर्ष करावा लागत आहे.
बँकिंग, आरोग्य, शिक्षण आणि ई-सेवा केंद्र या माध्यमांतून डिजिटल क्रांतीचे मॉडेल ठरलेले हरीसाल आता सर्वच क्षेत्रांत मागे पडले आहे. इंटरनेट सेवा बंद पडल्या आहेत, मोबाइल नेटवर्क अडखळते, आणि ई-सुविधा केंद्रे ओस पडली आहेत. गावात बसवलेली संगणक व्यवस्था धुळ खात पडली असून, त्याच्या दुरुस्तीसाठी कोणी पुढे येत नाही.
ग्रामसेवक गेल्या अनेक महिन्यांपासून गैरहजर असल्याने शासकीय कामकाज ठप्प झाले आहे. नागरिकांच्या तक्रारींवर कोणतीही दखल घेतली जात नाही. ग्रामस्थांच्या मते, डिजिटल गावाचे स्वप्न आता फक्त फलकापुरते उरले आहे, अशी कटू भावना गावभर व्यक्त होत आहे.
हरीसालच्या ग्रामपंचायत कार्यालय, प्राथमिक शाळा आणि बाजारपेठ परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. स्वच्छतेचा मागमूस नाही, शिस्त नाही, आणि जबाबदारीची जाणीव नाही. ग्रामसेवकाचा पत्ता नाही, अधिकारी येतात, फोटो काढतात आणि परत जातात, पण कोणतीही ठोस कारवाई होत नाही. नागरिकांचे अर्ज व तक्रारींच्या फाईल्स दुर्लक्षाच्या ढिगार्‍यात दडल्या आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, पेसा निधी व ग्रामपंचायतीच्या सामान्य फंडाचा हिशोब अस्पष्ट आहे. किती निधी आला आणि कुठे गेला – याची माहिती कोणाकडेही नाही. ग्रामसेवकाने लेखी अहवाल सादर केलेला नसल्याने पारदर्शकतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गटविकास अधिकारी कार्यालयाकडूनही कोणतीही दखल घेतली गेलेली नाही. परिणामी ग्रामस्थांमध्ये तीव्र रोष आहे. फैलढाणा देशातील पहिले डिजिटल गाव हरीसालचं …
परिसरातील साप्ताहिक बाजारपेठेत कचर्‍याचे ढिगारे, दुर्गंधी आणि अस्वच्छता नित्याची झाली आहे. प्रशासन आणि संबंधित अधिकारी मात्र ऑल इज वेल म्हणत बिनधास्त फिरताना दिसतात. या दांभिकतेमुळे नागरिकांचा संताप दिवसेंदिवस वाढत आहे.
गावकर्‍यांनी आरोप केला आहे की, अधिकारी येतात, फोटो काढतात आणि निघून जातात. पण गावातील घाण, समस्यांचा ढिगारा आणि निष्क्रिय ग्रामसेवकाकडे कोणीही लक्ष देत नाही. त्यांच्या या हतबलतेने प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हरीसालच्या प्रवेशद्वारावर अजूनही डिजिटल इंडिया – ट्रान्सफॉर्मिंग इंडिया असा झगमगता फलक लावलेला आहे, पण तो आता उपहासासारखा वाटतो. गावातील रस्ते मोडकळीस आले आहेत, इमारती जीर्णावस्थेत आहेत आणि ग्रामपंचायतीचे कार्यालय निष्क्रिय आहे. हे दृश्य ‘डिजिटल भारताच्या’ स्वप्नाची हसे करण्यासारखे आहे.
ग्रामस्थांनी इशारा दिला आहे की, निष्क्रिय ग्रामसेवकावर आणि त्याला पाठबळ देणार्‍या अधिकार्‍यांवर तातडीने कारवाई झाली नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू. हरीसालची आजची अवस्था ही केवळ एका गावाची कहाणी नाही, तर ती संपूर्ण ग्रामीण भारतातील प्रशासनिक उदासीनतेचे प्रतिबिंब आहे. ‘डिजिटल इंडिया’चा जयघोष करणार्‍या शासनाने आता स्वतःच्या आरशात पाहणे गरजेचे आहे, कारण विकास तंत्रज्ञानाने नव्हे तर जबाबदारीने घडतो – आणि ती जबाबदारीच हरीसालमध्ये हरवली आहे.
हरीसालची डिजिटल वाटचाल – आता थांबलेली!
2016 मध्ये ‘पहिले डिजिटल गाव’ म्हणून देशात गौरव.
प्रत्येक घरात इंटरनेट, ई-बँकिंग, डिजिटल पेमेंट सुविधा.
आता ग्रामपंचायत कार्यालय बंद, संगणक धुळ खात.
प्रशासनाकडून कोणतीही दखल नाही.

संबंधित बातम्या

Back to top button