अचलपूर-परतवाड्याच्या उपजिल्हा रुग्णालयाची दयनीय अवस्था
रिक्त पदांच्या विळख्यात आरोग्य व्यवस्था पूर्णपणे हतबल

* पदभरतीच्या अनागोंदी कारभाराचा जुळ्या शहरांना मोठा फटका
* एकोणीस परिचारिकांच्या खांद्यावर शंभर खाटांचा अवाढव्य भार
* रुग्णसेवेचा शास कोंडला; शासन ढिम्म अन् लोकप्रतिनिधींचे मौन
परतवाडा / 18 मार्च : अचलपूर आणि परतवाडा या जुळ्या शहरांमधील आरोग्याचा मुख्य कणा समजल्या जाणार्या उपजिल्हा रुग्णालयाची सध्या मोठी खस्ता हालात झाली असून पदभरतीचा सावळागोंधळ चव्हाट्यावर आला आहे. शासकीय नियमानुसार आवश्यक पदे भरण्याकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने रिक्त पदांच्या विळख्यात अडकलेल्या या मोडकळीस आलेल्या आरोग्य व्यवस्थेमुळे अचलपूरसह परतवाड्यातील गरीब रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत. शंभर खाटांचे रुग्णालय असूनही केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतपत परिचारिकांवर कामाचा प्रचंड डोंगर साचला आहे. शासन या अंदागोंदी कारभारात नेमकी कधी सुधारणा करणार याकडे सर्वांचे डोळे लागले असले तरी, जनतेच्या प्रश्नावर बोलणारे लोकप्रतिनिधी मात्र सध्या सोयीस्कर मौन बाळगून असल्याचे संतापजनक चित्र समोर आले आहे. अचलपूर आणि परतवाडा या जुळ्या शहरांची जीवनवाहिनी असलेल्या उपजिल्हा रुग्णालयाचे सध्या पुरते धिंडवडे निघाले असून येथील वास्तव अत्यंत भयावह आहे. रुग्णालयाची क्षमता शंभर खाटांपर्यंत वाढवण्यात आली असली, तरी त्या प्रमाणात नवीन पदभरती करण्याकडे शासनाचे सपशेल दुर्लक्ष झाले आहे. आरोग्य नियमानुसार या ठिकाणी किमान सत्तावीस परिचारिकांची अत्यंत निकड आहे, मात्र प्रत्यक्षात केवळ एकोणीस परिचारिकांच्या खांद्यावर या अवाढव्य रुग्णालयाचा डोलारा उभा आहे. यातही मोठी अडचण तेव्हा येते जेव्हा काही परिचारिका रजेवर असतात. अशा वेळी केवळ सोळा परिचारिकांनाच तीन सत्रांमध्ये दिवस-रात्र एक करून अखंड सेवा द्यावी लागते. सोमवार ते शनिवार उसंत न घेता काम केल्यामुळे या कर्मचार्यांची कमालीची शारीरिक आणि मानसिक ओढाताण होत आहे. जिल्हा मुख्यालय असलेल्या अमरावतीतही पदभरतीचा हाच अंदागोंदी प्रकार सुरू असून, त्याचा थेट तडाखा आता अचलपूरलाही बसत आहे. अचलपूर आणि परतवाडा परिसरातील गाव-खेड्यातून उपचारासाठी येणार्या गरीब रुग्णांना वेळेवर औषधोपचार आणि देखरेख मिळणे कठीण झाले आहे. कामाचा ताण इतका वाढला आहे की, एखाद्या परिचारिकेला घरगुती किंवा तातडीच्या कामासाठी रजा हवी असल्यास इतर सहकार्यांवर कामाचा दुप्पट भार पडतो. पुरेशी विश्रांती आणि रजा मिळत नसल्याने त्याचा थेट परिणाम रुग्णसेवेच्या गुणवत्तेवर होताना दिसत आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे, जुळ्या शहरांमधील या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी एकही लोकप्रतिनिधी पुढे येताना दिसत नाही. जनतेच्या मतावर निवडून आलेले लोकप्रतिनिधी या विषयावर गप्प का, असा जळजळीत सवाल आता अचलपूर आणि परतवाड्यातील सामान्य नागरिक विचारत आहेत. सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनीही या विषयावर मौन धारण केल्याने सर्वसामान्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. रुग्णसेवा सुरळीत ठेवण्यासाठी आणि कर्मचार्यांवरील हा असह्य ताण कमी करण्यासाठी रिक्त पदे तातडीने भरणे हीच आता एकमेव उपाययोजना उरली आहे. प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी या ज्वलंत प्रश्नाकडे गांभीर्याने बघून त्वरित कार्यवाही करावी, अन्यथा अचलपूरची संपूर्ण आरोग्य व्यवस्था कोलमडून पडण्यास वेळ लागणार नाही अशी भीती व्यक्त होत आहे. अचलपूर रुग्णालयातील खाटांची संख्या वाढली पण सेवा देणारे हात मात्र तोकडे पडत असल्याने येथील आरोग्य यंत्रणेचा कणाच मोडला असून हजारो रुग्णांची काळजी घेणे आता पूर्णपणे अशक्य झाले आहे. कर्मचार्यांच्या आरोग्यावरही याचा विपरीत परिणाम होत असून तातडीने पदभरती न झाल्यास अचलपूरची रुग्णसेवा पूर्णपणे ठप्प होण्याची चिन्हे आहेत.
बदल्यांमुळे रिक्त झालेल्या जागांचा प्रश्न

मागील काही काळात चार परिचारिकांच्या बदल्या झाल्यामुळे रुग्णालयात पदे रिक्त झाली आहेत. यामुळे उपलब्ध कर्मचार्यांवर कामाचा बोजा वाढला आहे. आम्ही संबंधित वरिष्ठ कार्यालयाकडे नवीन नियुक्त्यांसाठी रीतसर प्रस्ताव सादर केला आहे. वरिष्ठ स्तरावरून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादानुसार, या महिनाअखेरपर्यंत ही रिक्त पदे भरली जाण्याची शक्यता असून त्यानंतर रुग्णालयाचा कारभार पुन्हा सुरळीतपणे सुरू होईल. – डॉ. जाकीर हुसेन (आर.एम.ओ., उपजिल्हा रुग्णालय)
कर्मचार्यांवरील ताण आणि रिक्त पदे

रुग्णालयात परिचारिकांची संख्या कमी असल्याने कामाचा प्रचंड ताण निर्माण होत आहे. कर्मचार्यांना साप्ताहिक सुटी मिळणे कठीण झाले असून, सोमवार ते शनिवार सतत कर्तव्यावर राहावे लागते. एखाद्याने सुटी घेतल्यास इतर सहकार्यांवर कामाचा अतिरिक्त भार पडतो. सेवा विस्कळीत होऊ नये यासाठी रिक्त असलेली परिचारिकांची पदे तातडीने भरली जाणे अत्यंत गरजेचे आहे.
– रजनी नागोरे (सहाय्यक अधीक्षक सेविका)
वरिष्ठ स्तरावर पदभरतीसाठी पाठपुरावा

अचलपूर उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदांबाबत आम्ही अकोला उपसंचालकांकडे लेखी पत्रव्यवहार केला आहे. त्यांच्या दौर्यादरम्यानही कर्मचार्यांच्या कमतरतेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली असून परिस्थितीची गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. प्रशासकीय प्रक्रिया सध्या प्रगतीपथावर असून, चालू महिना संपण्यापूर्वी नवीन कर्मचार्यांची नियुक्ती होईल आणि कामाचा ताण कमी होईल अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे. – डॉ. सुरेंद्र ढोले (वैद्यकीय अधीक्षक, अचलपूर)




