15 तारखेला घड्याळ बंद करायचे
मुख्यमंत्री फडणवीसांचा अजित पवारांवर निशाणा

पुणे /13 जानेवारी : पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचा राच्या सांगता सभेवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. 15 तारखेला घड्याळ बंद करायचे आणि ते घरी ठेवायचे, मग उमेदवार काळा की गोरा हे पाहायचे नाही, कमळाचे बटण दाबायचे, असे म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी अजित पवार यांना लक्ष्य केले आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, केंद्रात आणि राज्यात आपले सरकार आहे. महापालिकेत सुद्धा आपले सरकार आणायचे आहे. त्यातही 15 तारखेला उठायचे. सकाळी उठण्यासाठी घड्याळाचा अलार्म लावायचा. अलार्म वाजला की घड्याळ बंद करायचे आणि घड्याळ घरीच ठेवायचे. मग मतदान केंद्रावर गेल्यावर मशीनवर फक्त कमळ पहायचे, उमेदवार काळा की गोरा आहे, हे पाहायचे नाही. फक्त कमळ लक्षात ठेवायचे.
पुण्यात सांगता सभा घेण्याचे दोन कारणं आहेत. शिवाजीनगर मतदारसंघ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने एकमेव विधानसभा मतदारसंघ आहे. इथे सांगता सभा घेतली तर सगळ्यांचा आशीर्वाद मिळतो तसंच ही जागा शुभ आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले. काही लोकांना वाटतं की महापालिका निवडणूक गल्ली मधला दादा तयार करण्याची आहे. पण या निवडणुकीकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.




