मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

अ‍ॅड.यशोमती ठाकूर यांची मागणी

* पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणात युती सरकारवर टीकास्त्र

अमरावती /10 नोव्हेंबर – पुण्यातील चर्चित पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणावरून काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांनी राज्यातील सत्ताधारी युतीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ठाकूर यांनी या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.
यशोमती ठाकूर यांनी प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये पार्थ पवार यांच्या अमेदिया कंपनीने पुण्यातील 1,800 कोटी रुपयांची जमीन केवळ 300 कोटी रुपयांत खरेदी केल्याचा आरोप केला आहे. या व्यवहारात स्टॅम्प ड्युटीमध्ये घोटाळा झाल्याने शासनाच्या महसुलाचे मोठे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. ठाकूर म्हणाल्या की, या प्रकरणात एकूण 99 टक्के हिस्सा पार्थ पवार यांच्याकडे असून, केवळ 1 टक्का हिस्सा असलेल्या त्यांच्या नाते वाईक पाटील यांच्या विरुद्ध एफआयआर दाखल कर ण्यात आला आहे. मात्र, पार्थ पवार यांच्यावरील कारवाई टाळण्यात आली आहे. ही बाब अत्यंत संशयास्पद असून, सत्ता आणि प्रभाव वापरून हे प्रकरण दडपले जात आहे. त्या पुढे म्हणाल्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामधील राजकीय समजुतीमुळेच पार्थ पवार यांना या प्रकरणातून वाचवण्यात आले आहे. अन्यथा एवढ्या मोठ्या आर्थिक घोटाळ्यानंतर कोणत्याही सामान्य व्यक्तीला तुरुंगवास भोगावा लागला असता. पण या प्रकरणात सत्ताधारी नेत्यांच्या मुलांवर कारवाई न होणे म्हणजे न्यायव्यवस्थेची खिल्ली उडविणे आहे. ठाकूर यांनी भाजपवर तीव्र शब्दांत टीका करताना म्हटले की, भाजपचे वॉशिंग मशीन दिवसेंदिवस अधिक प्रभावी होत आहे. या मशीनमधून गेल्यावर कोणताही नेत्याचा डाग धुतला जातो. सत्ताधार्‍यांचे लोक गुन्ह्यांमधून सुटतात, आणि सामान्य कार्यकर्त्यांना अन्याय सहन करावा लागतो. हे लोकशाहीला शोभणारे नाही. काँग्रेस नेत्या म्हणाल्या की, राज्यातील जनता महागाई, बेरोजगारी आणि शेतकर्‍यांच्या समस्यांनी त्रस्त आहे. त्यावर लक्ष न देता सत्ताधारी नेते आपल्या कुटुंबीयांना वाचवण्यात गुंतले आहेत. यामुळे राज्य सरकारचा नैतिक अधिकार संपला आहे. त्यामुळे ठाकूर यांनी ठामपणे सांगितले की, या प्रकरणाची सखोल चौकशी होईपर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला राजीनामा द्यावा, तसेच या संपूर्ण प्रकरणात सत्तेचा गैरवापर केल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पदाचा राजीनामा देऊन चौकशीस सामोरे जावे.

संबंधित बातम्या

Back to top button