प्रियकराने प्रेयसीचं लग्न मोडलं

पाच लाखांची मागणी करुन अश्लील चित्रफित प्रसारित केली

शेगावच्या आरोपीविरुद्ध परतवाडयात गुन्हा दाखल

अमरावती /6 मार्च पाच वर्षांच्या प्रेमसंबंधाचा अंत इतका भयानक होईल, याची पुसटशी कल्पनाही त्या पीडित तरुणीला नव्हती. जुन्या प्रेमाचा सूड उगवण्यासाठी एका माथेफिरूने तरुणीचे ठरलेले लग्न मोडलेच, शिवाय तिला शरीरसुखाची मागणी करून पाच लाख रुपयांसाठी धमकावले. या धक्कादायक प्रकारामुळे हादरलेल्या तरुणीने अखेर परतवाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी शेगाव येथील कुंभारवाडा रहिवासी नागेश प्रभाकर बावस्कार (वय 31) याच्यावर गुन्हा दाखल करून चौकशीला वेग दिला आहे.
या प्रकरणाची हकीकत अशी की, 26 वर्षीय पीडित तरुणीचे नागेश बावस्कार याच्यासोबत सन 2021 पासून प्रेमसंबंध होते. काही कारणास्तव त्यांच्यात दुरावा आला आणि त्यांनी नातं संपवलं. पुढे तरुणीचं लग्न दुसर्‍या तरुणासोबत ठरलं. ही बातमी नागेशला समजताच त्याच्यातील नराधम जागा झाला. त्याने सूडभावनेने पीडितेच्या होणार्‍या पतीला त्यांच्या जुन्या संभाषणाचे पडद्यावरील चित्रे (स्क्रीनशॉट) आणि चलचित्रे (व्हिडीओ कॉल) पाठवून दिले. यामुळे तरुणीची मोठी बदनामी झाली आणि तिचे ठरलेले लग्न मोडले. लग्नाचं स्वप्न भंगल्याने खचलेल्या तरुणीला नागेशने पुन्हा त्रास देणे सुरू केले. त्याने तिच्या काकूला फोन करून तरुणीवर दबाव आणला, तसेच पाच लाख रुपयांची मागणी करत शरीरसुखासाठी धमकावले. या जाचाला कंटाळून पीडितेने गुरुवारी 5 मार्च रोजी पोलिसात तक्रार नोंदवली. पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा नोंदवला आहे. डिजिटल युगातील धोक्याचा इशारा-मोबाईलवरील खासगी संवाद आणि चित्रे ही एखाद्याच्या आयुष्यात कशी वादळे आणू शकतात, याचे हे जिवंत उदाहरण आहे. प्रेमाच्या नावाखाली विश्वासघात करणार्‍या प्रवृत्तींपासून सावध राहण्याची गरज असून, अशा संकटात घाबरून न जाता कायदेशीर लढा देणे हाच एकमेव मार्ग असल्याचे या घटनेतून स्पष्ट होते.

संबंधित बातम्या

Back to top button