युवकाचा मृतदेह 10 दिवसांनी आढळला

माडु नदीत वाहून गेलेल्या

* मृतदेह मुलताई पोलिसांनी दिला मोर्शी पोलिसांच्या ताब्यात

मोर्शी/22 सटेंबर – मोर्शी शहरातील खोलवाटपूरा येथील अठरा वर्षीय तरुण मध्यप्रदेश हद्दीतील माडू नदीच्या पात्रात वाहून गेला होता. त्या तरुणाचे प्रेत तब्बल दहा दिवसांनंतर अतिशय कुजलेल्या अवस्थेत आज 23 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता आढळून आले. मोर्शी शहराच्या मध्यभागात असलेल्या खोलवाटपूरा येथील बारावीचे शिक्षण घेत असलेला कुणाल किशोर बागडे (वय 18) हा मोर्शी व नेरपिंगळाई येथील दोन इसमांसोबत सालबर्डी येथून आठनेरकडे जाणाऱ्या मार्गावरील अमराई येथे मौजमजा करण्यासाठी गेला होता. तेथून वाहणाऱ्या माडू नदीच्या पात्रात कुणाल पोहण्यासाठी उतरला असता तो अचानक वाहून गेल्याची घटना 13 सप्टेंबर रोजी घडली.

13 सप्टेंबर रोजीच घरून निघून गेल्याची फिर्याद मोर्शी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली होती. त्या अनुषंगाने मोर्शी पोलिसांनी मिक्सिंगचा रिपोर्ट दाखल करून तपास सुरू केला होता. दरम्यान अमरावती व बैतूल येथील बचाव पथकाच्या टीमला घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. दोन्ही बचाव पथकांनी संयुक्तरीत्या शोधकार्य केले, मात्र कुणालचा शोध घेण्यात यश आले नाही. शेवटी 23 सप्टेंबर रोजी कुणालचा मृतदेह मध्यप्रदेश येथील सालबर्डी गावाजवळ वाहणाऱ्या माडू नदीच्या पुलाखाली अतिशय छिन्नविछिन्न व कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.

घटनास्थळ हे मध्यप्रदेशातील मुलताई पोलीस स्टेशन अंतर्गत असल्यामुळे तेथील पोलीस पथक तसेच मोर्शी पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल आठवले, पोलीस उपनिरीक्षक आकाश शिवणकर, रामकिसन नांदगावकर, तुषार चव्हाण, पोलिस अंमलदार छत्रपती करपते, सुनील अकोलकर, मंगेश श्रीराव यांनी घटनास्थळी जाऊन सालबर्डी गावातील नागरिकांच्या मदतीने कुणालचा मृतदेह नदीपात्राबाहेर काढून शवविच्छेदनाकरिता मुलताई येथील दवाखान्यात पाठवला. यावेळी कुणालचे नातेवाईक सुद्धा घटनास्थळी उपस्थित होते. पुढील तपास मध्यप्रदेश पोलीस करीत आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button