सावळा येथील मोठ्या सावकाराचा गाशा गुंडाळला

शेतकर्‍यांच्या तक्रारीवरून सहकार विभागाचा दणका

* घरासह गोठ्यातून मुद्देमाल आणि गाड्या जप्त

अमरावती/22 फेब्रुवारी – जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील सावळा गावात अवैध सावकारी करणार्‍या एका मोठ्या माशावर सहकार विभागाने जोरदार कारवाई केली आहे. गोपाल प्रभाकरराव टेकाडे नावाच्या व्यक्तीने शेतकर्‍यांची अडवणूक करून त्यांना व्याजाच्या जाळ्यात ओढले होते. धामणगाव रेल्वे आणि रायपूर कासारखेड येथील शेतकर्‍यांनी हिंमत दाखवून जिल्हा उपनिबंधकांकडे या जाचाविरुद्ध लेखी तक्रार केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार यांनी दोन विशेष पथके तयार केली आणि 2 जानेवारी 2026 रोजी सकाळीच टेकाडे याच्या घर आणि शेतशिवारावर धाड टाकली. या कारवाईत टेकाडेच्या घरातून तब्बल 21 कोरे धनादेश, 5 लाखांचे भरलेले धनादेश, 20 कोरे स्टॅम्प पेपर आणि 26 मालमत्तेची कागदपत्रे जप्त करण्यात आली. धक्कादायक म्हणजे शेतातील गोठ्यातून ट्रॅक्टर, रोटावेटर आणि महागड्या गाड्याही जप्त झाल्या. चौकशीत अवैध सावकारीचा प्रकार उघड झाल्याने आता गोपाल टेकाडे विरुद्ध दत्तापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण तालुक्यात या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे. स्वाती गुहदे (मोर्शी) आणि सचिन पतंगे (नांदगाव खंडेश्वर) यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई अत्यंत गुप्तपणे पार पाडली. टेकाडे याच्या शेतात जे चित्र दिसले ते पाहून अधिकारीही चक्रावून गेले. तिथे केवळ शेतीच होत नव्हती, तर गरिबांच्या मालमत्ता हडपण्याचे केंद्र चालवले जात होते. जप्त केलेल्या साहित्यामध्ये 3 ट्रॅक्टर, 1 चारचाकी गाडी, 7 पलटी नांगर, 3 रोटावेटर, 5 पेरणी यंत्रे आणि लोखंडी बंडी अशा मोठ्या अवजारांचा समावेश आहे. सहकार विभागाने सर्व पुराव्यांची आणि कागदपत्रांची कसून तपासणी केली. सुनावणी दरम्यान टेकाडे याला आपली बाजू मांडण्यासाठी नोटीस दिली होती, परंतु तो कोणतेही ठोस पुरावे देऊ शकला नाही. अखेर सहकार अधिकारी येसुदास खोब्रागडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून महाराष्ट्र सावकारी नियमन कायद्याच्या कलम 39 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला. या कारवाईमुळे सावकारी पाशात अडकलेल्या अनेक शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला असून, अवैध धंदे करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button