‘लाडकी बहीण योजना’ कायम राहणार

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची स्पष्टोक्ती

* जाहीर सभेत उपस्थितांना मार्गदर्शन

* शहराच्या विकासासाठी मुबलक निधी देणार

अंजनगाव सुर्जी/19 डिसेंबर  : नगरपरिषद निवडणुकीच्या शेवटच्या प्रचार दिवशी भारतीय जनता पार्टीने आज अंजनगाव सुर्जी येथे भव्य रोड शो आणि जाहीर सभा आयोजित केली. या सभेला महसूल मंत्री तसेच अमरावती जिल्ह्याचे पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी रॅली आणि जाहीर सभेत उपस्थित नागरिकांशी संवाद साधताना विकासाच्या निती व योजनांचा ठाम ठोकळा दिला.
सभेत बोलताना बावनकुळे यांनी सांगितले की, जो पर्यंत भाजपचे सरकार आहे, तो पर्यंत लाडकी बहिणींना काळजी करण्याची गरज नाही. लाडकी बहीण योजना अखंड चालू राहणार असून या योजनेअंतर्गत निधीची वाढीव तरतूद करण्यात येणार आहे. त्यांनी मतदारांना आश्वस्त करत सांगितले की, अंजनगाव सुर्जीच्या विकासासाठी जेवढा निधी लागेल तो सरकारकडून उपलब्ध करून दिला जाईल, निधीची कमतरता येऊ दिली जाणार नाही.
बावनकुळे यांनी स्पष्ट सांगितले की, अंजनगाव सुर्जीचा विकास नगरपरिषदापुरता मर्यादित नसून तो राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांशी जोडलेला आहे. त्यांनी उपस्थित नागरिकांना आवाहन केले की, नगराध्यक्ष पदासाठी भाजपाचे उमेदवार अविनाश गायगोले आणि सर्व नगरसेवक यांना विजयी करून आणा, त्यामुळे शहराच्या विकासाची गती अधिक वेगाने वाढेल. भाजपाच्या विकास योजनांची रूपरेषा मांडताना बावनकुळे यांनी सांगितले की, अंजनगाव सुर्जीकरिता सौर ऊर्जा वरील वीज प्रकल्प तयार करण्यात येणार असून त्यासाठी प्रधानमंत्री सूर्य घर योजना राबवली जाईल. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकर्‍यांचे 27 हजार कोटी रुपयांचे कर्ज माफी करण्यात आले आहे. भविष्यातही जर भाजपचा नगराध्यक्ष निवडून आला, तर शहरातील 124 विविध विकास योजना राबवण्यात येणार असून पालक मंत्री म्हणून निधीदेखील थेट अंजनगावकरिता उपलब्ध करून दिला जाईल. बावनकुळे यांनी आणखी सांगितले की, अंजनगाव सुर्जी येथे श्री संत रूपलाल महाराजांचे राष्ट्रीय स्मारकही तयार करण्यात येणार आहे. या माध्यमातून केवळ धार्मिक व सांस्कृतिक वारसा जतन होणार नाही, तर पर्यटनाला चालना मिळून शहराची ओळख अधिक उजळेल. भाजपाच्या प्रचार सभेत महसूल मंत्री आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे सोबत आ.प्रवीण तायडे, आ.संजय कुटे, आ.प्रभूदास भिलावेकर, रणजीत पाटील, आमदार प्रविण पोटे पाटील, जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. तसेच शहरातील नागरिक आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती भव्य होती. बावनकुळे यांनी तांत्रिक अडचणीमुळे उशीर झाल्याबद्दल माफीही मागितली.सभेत बावनकुळे यांनी ठामपणे सांगितले की, अंजनगाव सुर्जीचा विकास हा भाजपच्या मजबूत नेतृत्वाखालीच शक्य आहे. राज्य व केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घेऊन शहरातील प्रत्येक क्षेत्रात सुधारणा साधली जाईल. त्यांनी नागरिकांना आवाहन केले की, उद्याच्या नगरपरिषद निवडणुकीत भाजपाला संधी देऊन विकासाच्या वाटचालीत सहभागी व्हा.

संबंधित बातम्या

Back to top button