जिल्ह्यात 12 नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु

3.5 लाख मतदारांची परीक्षा, युती की स्वबळावरचा खेळ? : नगरांचा रंगमंच सजला, सत्तासंग्रामाला पडदा उघडला

अमरावती / 5 नोव्हेंबर – राज्य निवडणूक आयोगाने बिगुल फुंकताच अमरावती जिल्ह्यातील राजकीय रंगभूमी उजळून निघाली आहे. गेल्या साडेतीन वर्षांपासून शांत पडलेले राजकारण आता पुन्हा सजले आहे . पोस्टरचे रंग, गल्ल्यांतील चर्चा आणि नेत्यांच्या चेहर्‍यावरील भाव याचं एकाच सूत्रात रूपांतर झालंय. 2 डिसेंबर! या दिवशीच जिल्ह्यातील 10 नगरपरिषदा आणि 2 नगरपंचायतींमध्ये 278 नगरसेवक आणि 12 महापौर निवडले जाणार आहेत. 3 लाख 58 हजार 868 मतदार या रंगमंचाचे निर्णायक दिग्दर्शक ठरणार आहेत.
अचलपूर ते चिखलदरा – प्रत्येक नगर एक रंगमंच-काँग्रेसचा बालेकिल्ला की भाजपचा धक्का? दोन्ही गट समोरासमोर. दर्यापूर, मोर्शी, धामणगाव रेल्वे : ओबीसी समीकरणं आणि स्थानिक पॅनेलची थेट झुंज, चिखलदरा, शेंदुरजना घाट : आदिवासी मतदारांचा तोल कोण पकडेल यावर निकाल ठरणार.चांदूर रेल्वे, चांदूर बाजार : पारंपरिक गटबाजींचं केंद्र. जुने नेते आणि नवे चेहरे आमनेसामने. प्रत्येक नगराचा सूर वेगळा, पण ताल एकच – सत्ता आपल्या हाती!
महापौरपद थेट जनतेकडून : महिलांचा ‘सत्तास्वरसंग्राम’-या वेळी महापौरपदाची निवड थेट जनतेकडून होत असल्याने रंगमंचावरचा प्रकाश महिलांवर झोत टाकतोय. 12 पैकी 7 ठिकाणी महिला महापौर आरक्षण असल्याने – चांदूर रेल्वे, अचलपूर, चिखलदरा आणि धारणीतील महिला नेत्या आता थेट जनतेच्या न्यायासनासमोर. त्यांचा आत्मविश्वास आणि जनाधार या निवडणुकीत नवा ‘राजकीय सूर’ निर्माण करणार आहे.
पक्षांच्या रणनीतीचा गूढ पट
भाजप : महायुतीचा झेंडा फडकवावा की स्वतंत्र झुंज द्यावी, या दोलायमान भूमिकेत. काँग्रेस : कार्यकर्त्यांची उत्सुकता वाढवून स्थानिक नेतृत्वाचा लढा म्हणून मैदानात उतरण्याच्या तयारीत.राष्ट्रवादी (दोन्ही गट) : शरद पवार आणि अजित पवार समर्थक यांच्यातील समन्वय हीच खरी परीक्षा.शिवसेना (शिंदे गट) : ग्रामीण पातळीवरील सत्तेतून शहरी पातळीवर प्रवेशाचा प्रयत्न. शिवसेना (उध्दव गट) ः स्वबळावर स्थानिक नेतृत्वाचा लढा म्हणून स्वबळावर लढण्याच्या तयारीत असुन राजकीय पटावरच्या मोहरा मांडले गेले आहेत. आता चाल करायची बाकी आहे.
आकड्यांची रंगत एकूण मतदार – 3,58,868
मतदान केंद्रे – 439 (मागीलपेक्षा 79 अधिक)
सर्वाधिक मतदार – अचलपूर (97,700)
सर्वात कमी – चिखलदरा (3,366)
या आकड्यांमागे एक गोष्ट स्पष्ट दिसते – नागरीकरण वेगाने वाढते आहे आणि राजकीय गुंतवणूकही.

* शांततेची रणनीती?

आता प्रश्न असा – इतकी मोठी निवडणूक आणि तरीही पक्ष गप्प का? भाजप, काँग्रेस, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (दोन्ही गट) – सगळ्यांनी मौन राखलं आहे. युती होणार की नाही, हे कोणालाच सांगता येत नाही. नेत्यांच्या चेहर्‍यावरचे स्मित आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीतली खसखस सांगते – खेळ सुरू आहे, पण पत्ते अजून उघडायचे नाहीत.

संबंधित बातम्या

Back to top button