एएसआय अब्दुल कलाम यांच्या हत्येला व्याजाच्या पैशांची पार्श्वभूमि?

परतफेडीवरुन सावकाराशी भावाचा होता वाद

-दोन आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
-तिसर्‍या जखमी आरोपीवर रुग्णालयात उपचार
अमरावती / 29 जून: अमरावती शहरातील वलगाव पोलीस ठाण्यात कार्यरत सहायक पोलीस निरीक्षक अब्दुल कलाम यांच्या हत्येच्या घटनेमुळं अमरावती शहरात खळबळ उडाली असताना या हत्येमागील कारण पुढे आलं आहे. एएसआय अब्दुल कलाम यांच्या भावानं व्याजानं घेतलेल्या पैशांची परतफेड न केल्यानं उद्भवलेल्या वादातून सावकारांनी त्यांची हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलीस आयुक्त अरविंद चवरिया यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त सागर पाटील यांच्या नेतृत्वात गाडगेनगर पोलिसांनी या प्रकरणातील दोन आरोपींना अटक केली आहे. एक आरोपी गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याला देखील अटक केली जाईल असं पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी सांगितलं. जियानउद्दीन एहसानुद्दीन (22, रा. अराफत कॉलनी, अमरावती) आणि आवेज खान अयुब खान (22, रा. मोमीनपुरा, दर्यापूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीं नावे आहेत.
जमील कॉलनी परिसरातील रहिवासी सहायक पोलीस उपनिरीक्षक अब्दुल कलाम यांचे मोठे भाऊ यांनी एका खाजगी सावकाराकडून व्याजावर पैसे घेतले होते. या पैशांची परतफेड न केल्यानं सावकाराचे कुटुंब आणि अब्दुल कलाम यांचे बंधू आणि पुतण्या यांच्यात वाद झाला. या वादात अब्दुल कलाम यांनी मध्यस्थी केली होती, असे सांगण्यात येत आहे. याच वादातून एएसआय अब्दुल कलाम यांची हत्या झाली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. दुसरीकडे एवढ्या लहान कारणावरुन एका पोलिस अधिकार्‍याची अशा पद्धतीने निर्घुनपणे हत्या होणे शक्य आहे का? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. या प्रकरणात तपास अधिकारी आणखी तपास करत आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी दिली.
शनिवारी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास अब्दुल कलाम वलगाव पोलिस ठाण्यातून ड्युटी आटोपून अमरावतीला घरी परतत असताना नवसारी परिसरात त्यांच्या दुचाकीला मागून भरधाव वेगात येणार्‍या कारनं धडक दिली. या अपघातानंतर कारमधून दोन युवक उतरले. यानंतर त्यांनी अपघातात गंभीर जखमी असणार्‍या अब्दुल कलाम यांच्यावर धारदार शस्त्रानं वार करत त्यांचा खून केला. त्यानंतर मारकेरी फरार झालेत. तर चारचाकी चालक गंभीर जखमी झाला. या घटनेमुळं पोलीस दलात खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शनिवारी रात्री आरोपींच्या शोधासाठी मोहिम राबवली आणि काही तासांतच रात्री दोन आरोपींना गजाआड करण्यात आले. तर एक आरोपी गंभीर जखमी असल्याने त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
-शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शवविच्छेदनानंतर सहायक पोलीस उपनिरीक्षक अब्दुल कलाम यांच्यावर लालखडी परिसरातील कब्रिस्तानमध्ये शासकीय इतमामात दफनविधी करण्यात आला. यावेळी गाडगेनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस आयुक्त अरुण पाटील यांच्यासह यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. पोलिस पथकाने बंदुकीच्या फैरी झाडून एएसआय अब्दुल कलाम यांना सलामी दिली. अंत्यसंस्कारसमयी मोठा जनसमुदाय कब्रिस्तानमध्ये उपस्थित होता.
-दोन आरोपींना 5 जुलैपर्यंत पोलिस कोठडी
एएसआय अब्दुल कलाम हत्याकांडात गाडगेनगर पोलिसांनी जियाउद्दीन एहसानुद्दीन आणि आवेज खान अयुब खान या दोन आरोपींना घटनेनंतर काही तासात रात्रीच अटक करण्यात यश प्राप्त केले. आज दुपारी मोठ्या पोलिस बंदोबस्तात दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. दोघांनाही 5 जुलैपर्यंत चौकशीसाठी पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. तिसरा आरोपीही पोलिसांच्या तावडीत सापडला असून तो गंभीररीत्या जखमी आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आले नाही. आरोपींच्या पोलिस चौकशीतूनच अब्दुल कलाम हत्याकांडामागील कारण स्पष्ट होणार आहे.

संबंधित बातम्या

Back to top button