खतांची साठेबाजी करणार्या केंद्राला कृषी विभागाचा दणका
दोन केंद्रांचे परवाने कायमचे रद्द

* कृषि केंद्र चालकांमध्ये कारवाईमुळे खळबळ
अमरावती / 28 जानेवारी – जिल्ह्यातील शेतकर्यांची आर्थिक लुट करणार्या आणि खतांचा काळाबाजार करणार्या कृषी केंद्र चालकांवर कृषी विभागाने आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली असून यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. खतांची साठेबाजी करणे, छापील किमतीपेक्षा जास्त दराने विक्री करणे आणि मुख्य खतासोबत इतर अनावश्यक निविष्ठांची जबरदस्तीने विक्री (लिंकिंग) करणार्यांविरुद्ध प्रशासनाने वज्रप्रहार केला आहे.
या मोहिमेत खत नियंत्रण कायदा 1985 मधील तरतुदींचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन कृषी केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले असून, 21 केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाने शेतकर्यांना दर्जेदार खते योग्य दरात मिळावीत यासाठी विशेष भरारी पथके तैनात केली आहेत. प्रत्येक तालुक्यात खत नियंत्रक म्हणून 14 कृषी अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोणत्याही कृषी केंद्रात खताचा साठा असूनही नकार देणे, बनावट खतांची विक्री करणे किंवा जादा दराची मागणी झाल्यास शेतकर्यांनी न घाबरता तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्येक केंद्रावर आता ’क्यूआर कोड’ लावण्यात आले आहेत, ज्याद्वारे शेतकरी थेट भ्रमणध्वनीवरून आपली तक्रार नोंदवू शकतात. तसेच एका विशेष भ्रमणध्वनी क्रमांकावरही संदेश पाठवण्याची सोय करण्यात आली असून शेतकर्यांच्या हिताशी खेळणार्यांची गय केली जाणार नाही, असा सज्जड दम कृषी विभागाने दिला आहे.
तक्रारीसाठी प्रशासनाचे कवच-शेतकर्यांच्या सुविधेसाठी प्रशासनाने आधुनिक पावले उचलली आहेत. कोणत्याही फसवणुकीविरुद्ध प्रत्येक दुकानावरील सांकेतिक खुणेचा (क्यूआर कोड) वापर करून किंवा 8080536602 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संदेश पाठवून तक्रार नोंदवता येईल. तुमची एक सतर्क तक्रार भ्रष्ट विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यास मदत ठरेल.




