अमरावतीत 14 नोव्हेंबरपासून 64 वी हौशी मराठी राज्य नाट्यस्पर्धा
नाट्यरसिकांसाठी ठरणार सोळा नाट्यप्रयोगांची पर्वणी

अमरावती /9 नोव्हेंबर – मराठी रंगभूमीवरील सर्जनशीलतेचा उत्सव मानली जाणारी महाराष्ट्र शासनाची हौशी मराठी राज्य नाट्यस्पर्धा यंदा आपल्या 64 व्या वर्षात प्रवेश करत आहे. या स्पर्धेची प्राथमिक फेरी 14 नोव्हेंबरपासून अमरावती येथे भव्य उत्साहात सुरू होत असून, येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज सभागृह, डॉ. पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज परिसर या सुसज्ज नाट्यगृहात या स्पर्धेतील सर्व प्रयोग सादर होणार आहेत. या वर्षी प्रथमच या आधुनिक आणि उत्कृष्ट ध्वनीप्रणालीने सुसज्ज सभागृहात नाट्यस्पर्धेचे आयोजन होत असल्याने स्पर्धक संघांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांनाही या नव्या सभागृहात उच्च दर्जाचा नाट्यानुभव घेता येणार असल्याने संपूर्ण नाट्यप्रेमी अमरावती उत्सुकतेने या स्पर्धेकडे पाहत आहेत.
या स्पर्धेत राज्यातील विविध भागांमधून एकूण 16 हौशी नाट्यसंघ सहभागी होत असून, त्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील काही संघांचाही विशेष सहभाग आहे. 14 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर या कालावधीत दररोज संध्याकाळी 7 वाजता एक नाट्यप्रयोग रंगणार आहे. प्रत्येक प्रयोगानंतर प्रेक्षकांना वेगवेगळ्या विषयांवर आधारित नाटके, विविध शैलीतील अभिनय आणि नाट्यलेखनाचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.




