लाडक्या बहिणींमुळे सेनेचा विजय पक्का
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास

* नेहरू मैदानातील जाहीर सभेतून विरोधकांवर प्रहार
अमरावती/ 7 जानेवारी : राज्यातील माता भगिनींसाठी अत्यंत कल्याणाची ठरलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना रोखण्याचा प्रयत्न करणार्या विरोधकांना महाराष्ट्रातील महिलांनी मतपेटीतून सडेतोड उत्तर दिले आहे. अमरावती येथील नेहरू मैदानावर आयोजित भव्य प्रचार सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. आम्ही काय केले हे विचारणार्यांनी आधी आरसा पाहावा, असे म्हणत त्यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. महिला भगिनींच्या पाठीशी उभे राहण्याचे कार्य युती सरकारने केले असून ज्या उमेदवाराला महिलांचे आशीर्वाद लाभतात त्याचा विजय निश्चित असतो हेच या विधानसभा निवडणुकीने सिद्ध केले असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. केवळ 60 जागा लढवूनही शिवसेनेने मिळवलेला देदीप्यमान विजय हा जनसेवेचा आणि महिला शक्तीचा विजय असल्याचे शिंदे यांनी ठामपणे मांडले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात अत्यंत भावूक होत बालपणीच्या कष्टांना उजाळा दिला. आपण एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलो असून गरिबीचे चटके जवळून अनुभवले आहेत. घर चालवण्यासाठी आईला करावी लागणारी काटकसर आणि तिची तगमग पाहिली असल्यानेच भगिनींच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ही योजना सुरू करण्याचा ध्यास घेतला. ही योजना म्हणजे केवळ घोषणा नसून बहिणींना दिलेला भावाचा शब्द आहे. काही स्वार्थी प्रवृत्तींनी ही योजना न्यायालयीन कचाट्यात अडकवण्याचा प्रयत्न केला मात्र महाराष्ट्रातील सुज्ञ महिलांनी अशा अडथळे निर्माण करणार्यांना निवडणुकीत त्यांची जागा दाखवून दिली आहे. ही योजना भविष्यात कधीही बंद होणार नाही, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
शिवसेनेच्या विचारधारेशी प्रतारणा करून पक्षाला काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचे काम करणार्यांवर शिंदे यांनी कठोर प्रहार केला. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे रक्षण करण्यासाठीच आपण ऐतिहासिक उठाव केला आणि जनतेनेही त्याला मनापासून साथ दिली, असे त्यांनी सांगितले. एक सामान्य शेतकर्याचा मुलगा राज्याच्या उच्च पदावर बसलेला पाहून काहींना पोटदुखी होत आहे, अशा शब्दांत त्यांनी मत्सरी राजकारणावर टीका केली. अयोध्येतील भव्य राम मंदिर हे बाळासाहेबांचे स्वप्न होते आणि ते प्रत्यक्षात साकारण्याचे भाग्य महायुती सरकारला लाभले, याचा अभिमान त्यांनी व्यक्त केला.
कमी बोलणे आणि जास्त काम करणे हीच आपली ओळख असल्याचे सांगत त्यांनी गेल्या अडीच वर्षातील विकासकामांचा लेखाजोखा मांडला. सर्वसामान्यांच्या जीवनात सुवर्णकाळ आणणे हेच आपले अंतिम ध्येय असून, हजारोंच्या संख्येने लोक आजही शिवसेनेच्या प्रवाहात सामील होत आहेत. नगरपालिका निवडणुकीत 70 नगराध्यक्ष निवडून येणे, हा विकासकामांवर जनतेने ठेवलेला विश्वास आहे. महायुतीच्या काळात राबवण्यात आलेल्या जनहितार्थ योजनांमुळेच आगामी काळात विकासाची नवी शिखरे सर होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या ऐतिहासिक जनसभेला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड, अनुभवी नेते आनंदराव अडसूळ, ज्ञानेश्वर धाने पाटील, माजी आमदार कॅप्टन अभिजीत अडसूळ, शिवसेना सचिव संजय मोरे आणि माजी मंत्री जगदीश गुप्ता यांच्यासह संतोष बद्रे, प्रियंका विश्वकर्मा आणि प्रतीक्षा गुल्हाने यांसारख्या मान्यवरांची उपस्थिती होती.
वचनपूर्तीचा ध्यास आणि विकासाचा वाढता आलेख-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या कार्यकाळात शब्दाला जागणारा लोकनेता म्हणून प्रतिमा निर्माण केली आहे. केवळ लाडकी बहीण योजनाच नव्हे, तर शेतकर्यांसाठी घेतलेले धाडसी निर्णय आणि 70 नगरपालिकांमधील यश हे त्यांच्या वाढत्या लोकप्रियतेचे प्रतीक आहे. कमी जागा लढवूनही मिळालेला मोठा ’स्ट्राईक रेट’ हा त्यांच्या पारदर्शक कारभारावर जनतेने मारलेली मोहोर आहे, असे या सभेतील वातावरणावरून स्पष्ट झाले.




