अपघातात दुचाकीवरील शिक्षकाचा दुदैवी मृत्यू

नीलगाईच्या कळपाची धडक लागुन झालेल्या

वरुड । 27 नोव्हेंबर दुचाकीला नीलगाईच्या कळपाची धडक लागुन झालेल्या अपघातात शिक्षकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज (ता.27) पुसला येथील परिवहन विभागाच्या सिमा तपासणी नाक्यानजीक सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास घडली.
मुळचे मध्यप्रदेशातील रहिवासी असलेले दिनेश यशवंत धुर्वे (52) हे शहरातील एलआयसी बिल्डिंग परिसरात भाडयाने राहत होते. ते बनगाव जि.पांढुर्णा येथे शिक्षक होते. आज सायंकाळी 5.30 च्या सुमारास शाळा संपल्यानंतर ते एम.एच.27 एडी 1063 क्रमांकाच्या दुचाकीने वरुड येथील घरी परत येत असतांना वरुड पांढुर्णा मार्गांवरील पुसला नजीक असलेल्या परिवहन विभागाच्या सिमा तपासणी नाक्याजवळ त्यांच्या दुचाकीला नीलगाईच्या कळपाने जोरदार धडक दिली. धडक बसताच दिनेश धुर्वे खाली पडले. त्यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. रस्त्याने ये-जा करणार्‍या वाहनधारकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनाकरीता ग्रामीण रुग्णालयात रवाना केला. मृतक दिनेश धुर्वे यांची पत्नी सुद्धा शिक्षिका असून मुलगी डॉक्टर असल्याचे सांगण्यात येत आहे. अतिशय मृदू स्वभावाचे व कार्यतत्पर असलेल्या दिनेश धुर्वे यांच्या अपघाती निधनाने शोक व्यक्त करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

Back to top button