शिक्षकाची 23 लाख रुपयांची फसवणूक
शेअर बाजारातील गुंतवणुकीचे आमिष दाखवून

* सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल
* ऑनलाइन ट्रेडिंगच्या नावाखाली आर्थिक घोटाळा’
अमरावती / 4 नोव्हेंबर – शेअर बाजारात गुंतवणूक करून भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका खाजगी शिक्षकाची तब्बल 23 लाख 25 हजार 924 रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली आहे. फसवणुकीची जाणीव होताच पीडित शिक्षकाने सायबर पोलिस ठाण्यात धाव घेतली.
पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. फसवणुकीची सविस्तर कहाणी शहरातील ड्रीम्स पार्क रोड परिसरात राहणारे योगेश श्रीराम जाखोटिया (वय 38) हे खाजगी शिक्षक आहेत. ऑगस्ट महिन्यात त्यांना परदेशातून फोन आला. समोरच्याने स्वतःला शेअर बाजारातील तज्ज्ञ सांगत, ऑनलाइन ट्रेडिंगद्वारे मोठा नफा मिळवता येईल, असे आमिष दाखवले. यानंतर जाखोटिया यांना ‘एमएसी 88 फेअरप्ले’ नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सामील करण्यात आले. या ग्रुपवर त्यांना क्रिप्टो करन्सी आणि बिटकॉइन ट्रेडिंग बद्दल माहिती देत गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करण्यात आले. सुरुवातीला त्यांनी 5,000 ते 10,000 इतकी लहान गुंतवणूक केली, आणि काही दिवसांत नफ्याचे आकडे दाखवण्यात आले. त्यामुळे त्यांचा विश्वास बसला. यानंतर 11 सप्टेंबर रोजी त्यांना ‘चारएल88 लो’ या बनावट वेबसाइटद्वारे मोठी गुंतवणूक करण्यास सांगण्यात आले. त्यांनी आपल्या बँक ऑफ बडोदा खात्यातून विविध खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर केले. मात्र, पैसे परत मागितल्यावर संबंधितांनी उडवाउडवीची उत्तरे देत खोट्या पावत्या पाठवल्या. शेवटी जाखोटिया यांच्या लक्षात आले की, त्यांची चलाख पद्धतीने फसवणूक झाली आहे.एकूण 23,25,924.69 इतकी रक्कम ऑनलाइन फसवणूक करणार्यांनी हातोहात लाटली. त्यानंतर त्यांनी तात्काळ सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी संबंधित गुन्हेगारांविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि आयटी कायद्यांखाली गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.




