पोलिस शिपाई महिलेचा संशयास्पद मृत्यू

गळ्यावर जखमा, आत्महत्या की हत्या?

-वडाळीतील घटनेमुळे शहरात खळबळ
अमरावती / 1 ऑगस्ट : शहरातील वडाळी भागातील गुरुकृपा कॉलनी येथे एका महिला पोलीस सिपाईचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मृत महिला आशा धुळे (वय 38) या फ्रेजरपूरा पोलीस ठाण्यात कार्यरत होत्या. त्यांचा मृतदेह गुरुवारी त्यांच्या राहत्या घरात जमिनीवर पडलेल्या अवस्थेत आढळून आला असून, त्यांच्या गळ्यावर जखमेचा स्पष्ट निशाण असल्यामुळे हत्येची शक्यता वर्तवली जात आहे.
घटनेनंतर परिसरात खळबळ माजली असून, पोलीस दलातील सहकार्‍यांमध्येही संभ्रमाचे वातावरण आहे. या प्रकरणातील गंभीर बाब म्हणजे मृत महिलेचा पतीही पोलीस खात्यात कार्यरत असून, सध्या एसआरपीएफमध्ये (राज्य राखीव पोलीस बल) नियुक्त आहे. माहितीनुसार, गुरुवारी सकाळी आशा धुळे यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी आढळला. घराचे दार उघडे होते की बंद, घरात कोण होतं, हे तपासाअंती स्पष्ट होईल. मात्र, गळ्यावर असलेली जखम गंभीर स्वरूपाची होती, ज्यामुळे आत्महत्येपेक्षा हत्येचा संशय अधिक बळावतो.
पोलीस सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे, प्राथमिक दृष्टिकोनातून दोन्ही शक्यतांचा विचार करून तपास सुरू करण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचं नेमकं कारण समजू शकेल. तसंच, घरातील सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल्स, आणि मोबाईल लोकेशन यांचा अभ्यास सुरू आहे. हा एक साधासरळ कौटुंबिक वादाचा परिणाम आहे की, यामध्ये काही अधिक गंभीर सामाजिक किंवा मानसिक ताण आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, पोलीस खात्यातील एक कर्मचारी स्वतःच्या घरी असे मृतावस्थेत सापडणं ही गोष्ट नक्कीच अस्वस्थ करणारी आहे. फ्रेजरपूरा पोलीस विभागाने घटनेची गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे. शवविच्छेदन अहवाल आणि तांत्रिक पुरावे मिळाल्यानंतरच नेमकी दिशा ठरेल, अशी माहिती तपास अधिकार्‍यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button