विद्यार्थ्यांनी सर्वच क्षेत्रात प्रकाशाच्या वाटा शोधाव्या

मनपा आयुक्त सोम्या शर्मा यांचे प्रतिपादन

* विद्यापीठाच्या युवा महोत्सवाचा शानदार शुभारंभ

अमरावती /7 ऑक्टोबर – संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या युवा महोत्सव-2025 चा शुभारंभ श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयात अमरावती महापालिकेच्या आयुक्त सौ. सौम्या शर्मा (चांडक) यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी सौ. शर्मा यांनी युवा महोत्सवाचे उद्घाटन झाल्याची घोषणा करून विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की, शिक्षण घेत असताना त्यांनी राष्ट्र आणि समाज विकासासाठी कार्य केले पाहिजे. शैक्षणिक जीवनात अशा प्रकारच्या कार्यक्रमांना विशेष महत्त्व असते. “तमसो मा ज्योतिर्गमय” या उक्तीप्रमाणे विद्यार्थ्यांनी अंधाराला दूर सारून प्रकाशाच्या नव्या वाटा शोधल्या पाहिजेत, असे आवाहन त्यांनी केले. त्यांनी पुढे सांगितले की, विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगतीसोबतच अंगभूत कलागुणांचा विकास करावा, कारण युवा महोत्सवातून अनेक मोठे कलाकार घडले आहेत.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी सांगितले की, महाराष्ट्रभरात संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा युवा महोत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या व्यासपीठावरून आपल्या कलागुणांना वाव द्यावा. प्रमुख अतिथी व श्री गणेशदास राठी छात्रालय समितीचे अध्यक्ष श्री वसंतकुमार मालपाणी यांनी सर्वांगीण विकास हेच ध्येय असल्याचे सांगून विद्यार्थ्यांना शॉर्टकट न घेता परिश्रमपूर्वक यश संपादन करण्याचा सल्ला दिला. विशेष अतिथी म्हणून बुलडाणा जिल्ह्यातील पळसखेड येथील सेवा संकल्प प्रतिष्ठानचे सहसंस्थापक डॉ. नंदकुमार पालवे यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाला प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. रविंद्र कडू, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार भांगडिया, जुगलकिशोर गट्टाणी, विद्यार्थी विकास संचालक डॉ. राजीव बोरकर, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. निलेश कडू, महोत्सवाचे समन्वयक डॉ. तीर्थराज राय, डॉ. सोनल चांडक, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. सुनिता धोपटे, निवड समिती अध्यक्ष डॉ. निखिलेश नलोडे, सदस्य डॉ. सावन देशमुख, डॉ. शर्मिला देशमुख, डॉ. प्रशांत बागडे, श्री विज शर्मा आणि डॉ. सीमा देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगे बाबा व रायबहादूर श्री गणेशदास राठी यांच्या प्रतिमापूजनाने, मा. सरस्वती मूर्तीपूजनाने आणि विद्यापीठ गीताने झाली. प्रास्ताविकातून डॉ. राजीव बोरकर यांनी चार दिवस चालणाऱ्या युवा महोत्सवातील विविध कलाप्रकारांची माहिती दिली, तर स्वागतपर भाषण डॉ. विजयकुमार भांगडिया यांनी केले.

या प्रसंगी आदर्श विद्यार्थी म्हणून वेदांत सुखदेव दुधे, कु. रेणुका जितेंद्र नाळे, उत्कृष्ट कलावंत पुरस्कारप्राप्त प्रणव विंगांभर कोरे, कु. प्रगती सतिश सुदा, उत्कृष्ट एनसीसी कॅडेट अनुज दीपक टेंगरे आणि कु. साक्षी चंद्रकांत वानखेडे यांचा सन्मान करण्यात आला. तसेच, मागील वर्षी युवा महोत्सवाचे उत्कृष्टरितीने आयोजन केल्याबद्दल अकोल्यातील शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जगदीश साबू यांचा आणि उत्कृष्ट कामगिरीबद्दल चैनी पंचारिया हिचा सन्मान करण्यात आला.

महाविद्यालयाच्यावतीने सेवा संकल्प प्रतिष्ठानला एकवीस हजार रुपयांची धनराशी प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. माया वाटाणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. शर्मिला देशमुख यांनी मानले. कार्यक्रमाला व्य.प. सदस्य डॉ. व्ही.एम. मेटकर, डॉ. नितीन चांगोले, अधिसभा सदस्य, अमरावती शहर, तसेच अकोला, यवतमाळ, वाशिम आणि बुलडाणा जिल्ह्यांतील महाविद्यालयांचे प्राचार्य, संस्थाध्यक्ष, विद्यार्थी विकास अधिकारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वरश्री केतकर यांनी सादर केलेल्या ‘वंदे मातरम्’ गीताने उद्घाटन सोहळ्याची सांगता झाली.

संबंधित बातम्या

Back to top button