शिवणी रसुलापूरात विद्यार्थ्यांचा दोन तास रास्ता रोको

बस थांबा नसल्याने संतप्त विद्यार्थी रस्त्यावर

-एआयएसएफ व एआयवायएफच्या नेतृत्वात आंदोल
-एसटी महामंडळाविरोधात घोषणाबाजी
नांदगाव खंडेश्वर / 11 सप्टेंबर  : शिवणी रसुलापूर येथे राज्य परिवहन महामंडळाचा अधिकृत बस थांबा असूनही बसेस थांबत नसल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी गुरुवारी दोन तास रस्त्यावर उतरून जोरदार रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे अमरावती-यवतमाळ मार्गावरील वाहतूक पूर्णत: ठप्प झाली होती. एआयएसएफ व एआयवायएफच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनावेळी महामंडळाविरोधात ‘लाल परी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’ अशा गगनभेदी घोषणा देण्यात आल्या.
दररोज शेकडो विद्यार्थी आणि प्रवासी अमरावती, यवतमाळ, नांदगाव, नेर आदी शहरांत शिक्षणासाठी व कामानिमित्त प्रवास करतात. मात्र बस थांबा असूनही चालक-वाहकांच्या मनमानीमुळे बसेस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान होत होते. यापूर्वी 2013 व 2014 मध्येही या प्रश्नावर ठाण मांडून आंदोलन झाले होते. तरीदेखील अनेक वर्षांपासून मागणी प्रलंबित राहिली होती. अखेर गुरुवारी विद्यार्थ्यांनी व गावकर्‍यांनी महामंडळाविरोधात थेट रस्त्यावर उतरत वाहतूक ठप्प केली.
विद्यार्थ्यांनी आपल्या काही ठळक मागण्यांसाठी हे आंदोलन केले. मागण्यांमध्ये सर्व बसेस (लांब पल्ल्याच्या वगळता) शिवणी रसूलापूर येथे थांबवाव्यात, कायमस्वरूपी वाहतूक नियंत्रक नियुक्त करावा, प्रवाश्यांशी सौजन्यपूर्ण वर्तनाबाबत चालक-वाहकांना समज द्यावी, वेळापत्रक विद्यार्थ्यांना पुरवावे, मद्यप्राशन करणार्‍या चालक-वाहकांवर कारवाई करावी, बसेस प्रासंगिक करारावर गेल्यास पूर्वसूचना द्यावी, आदि मागण्यांचा समावेश होता. या आंदोलनाचे नेतृत्व ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या राज्य सचिव कॉ. प्रतिक्षा ढोके व युथ फेडरेशनचे राज्य कौंसिल सदस्य कॉ. प्रज्वल ढोके यांनी केले. आंदोलनात प्रामुख्याने नयन मंदुरकर, यश वैरागडे, चेतन वैद्य, ओम कळंबे, रणजित बनकर, आर्यन वंजारी, मनस्वी ढोके, जान्हवी कोठाळे, आदिती तरेकर, श्रावणी रघुते, तुषार कोठाळे, सुमित बावनकुळे, सोहम बनसोड, स्वराज कारमोरे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी व गावकरी सहभागी झाले.
-पोलीसांचा हस्तक्षेप-आंदोलनस्थळी अधिकारी
आंदोलनाचे गांभीर्य लक्षात घेऊन नांदगाव खंडेश्वर ठाण्याचे ठाणेदार लांबाडे यांनी तातडीने पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी विभागीय परिवहन अधिकारी रायलवार यांना पाचारण करून विद्यार्थी व महामंडळ यांच्यात संवाद साधून दिला. यावेळी विद्यार्थ्यांना प्रवासात होणार्‍या गैरसोयी, चालक-वाहकांची अरेरावी आणि मद्य प्राशनासारख्या तक्रारी विद्यार्थ्यांनी अधिकार्‍यांसमोर ठामपणे मांडल्या.
लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे
सादर केलेल्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत परिवहन अधिकारी रायलवार यांनी लिखित आश्वासन दिले. त्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र आंदोलनावेळी विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रखर घोषणांनी व रस्त्यावर ठाण मांडल्याने वातावरण तापले होते.

संबंधित बातम्या

Back to top button