महानगरपालिकेत मालमत्ता कर वसुलीसाठी कठोर पावले
आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांचे निर्देश

अमरावती /25 सटेंबर : महानगरपालिकेतर्फे आज दिनांक 25 सप्टेंबर 2025 रोजी मालमत्ता कर वसुली संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली सर्व वसुली लिपिक उपस्थित होते. बैठकीदरम्यान आयुक्तांनी स्पष्ट निर्देश दिले की, महानगरपालिकेच्या आर्थिक स्थितीच्या दृष्टीने मालमत्ता कराची वसुली अत्यंत महत्त्वाची आहे आणि वसुली लिपिकांनी नियमित दौरे करून थकबाकीदारांना कर भरण्यास प्रवृत्त करावे. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने मालमत्ता कर भरणे ही त्यांची जबाबदारी आहे, मात्र जे कर थकवित आहेत त्यांच्याविरुद्ध महानगरपालिका कठोर कारवाई करेल, असा ठाम इशारा त्यांनी दिला. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रकरण 11 व अनुसूची ड कराधान नियम प्रकरण 8 नुसार महानगरपालिका क्षेत्रातील जमीन व इमारतींवर कर आकारणी व वसुली करण्याचे अधिकार महानगरपालिकेस आहेत.
अमरावती महानगरपालिका क्षेत्रात रु. 1 लाख व त्यापेक्षा अधिक मालमत्ता कर थकबाकी असलेल्या सुमारे 2500 मालमत्ता आहेत आणि या थकबाकीदारांकडून कराची वसुली करण्यासाठी विशेष पावले उचलण्यात येणार आहेत. महानगरपालिका प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे की, शहरात अनेक नागरिकांनी बांधकाम परवानगी न घेता किंवा परवानगीतील अटी मोडून अतिरिक्त बांधकाम केलेले आहे. त्यामुळे रु. 1 लाख व त्यापेक्षा अधिक थकबाकी असलेल्या मालमत्ता धारकांची बांधकाम परवानगी तपासण्यासाठी उपअभियंता झोन यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती थकीत मालमत्ता धारकांची बांधकाम परवानगी तपासेल व विना परवानगी/अतिरिक्त बांधकाम आढळल्यास कायद्याअंतर्गत नोटीस निर्गमित करेल. आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी सर्वांना स्पष्ट केले की, कर वसुल करा, अन्यथा कठोर कारवाईसाठी तयार रहा, कारण थकबाकीदारांमुळे शहराच्या विकासकामांमध्ये अडथळे येतात.
बैठकीत असेही ठरवण्यात आले की, थकबाकीदारांना पुन्हा पुन्हा नोटिसा देण्याऐवजी अंतिम मुदतीनंतर थेट दंडात्मक कारवाई, जप्ती व इतर कायदेशीर उपाययोजना करण्यात येतील. महानगरपालिका प्रशासनाकडून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, विलंब न करता मालमत्ता कर तात्काळ भरा व शहराच्या विकासात सहभाग नोंदवा. बैठकेंदरम्यान उपायुक्त नरेंद्र वानखडे, मुख्यलेखापरिक्षक श्यामसुंदर देव, मुख्यलेखाधिकारी दत्तात्रय फिस्के, सहाय्यक आयुक्त नंदकिशोर तिखिले, भुषण पुसतकर, नितीन बोबडे, धनंजय शिंदे, उपअभियंता प्रमोद इंगोले, श्रीरंग तायडे, विवेक देशमुख, जयंत काळमेघ, सहाय्यक क्षेत्रीय अधिकारी नर्मदा चव्हाण, केशव ठाकरे, नरेंद्र देवरणकर, संजय निकम, वसुली लिपिक आदी उपस्थित होते. शेवटी आयुक्तांनी सर्व वसुली पथकांना उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कटिबद्ध राहण्याचे निर्देश देत, कर वसुल करा, अन्यथा कठोर कारवाईसाठी तयार राहा असा ठाम इशारा दिला.




